जिल्ह्यातील विविध समस्यांसंदर्भात भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अमर बोडलावार यांची आमदार मुनगंटीवार यांच्याकडे भेट…

100

प्रतिनिधी शरद कुकुडकर

चंद्रपूर : जिल्ह्यातील तसेच गोंडपिपरी तालुक्यातील शिक्षण, शेती, रोजगार हमी योजना व धान खरेदी केंद्रांच्या सुरूवातीसंबंधीच्या विविध गंभीर समस्यांच्या निवारणासाठी भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांनी आज आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेतली.

भारत हा कृषीप्रधान देश असून ग्रामीण भागातील ८०% जनता ही शेती व मजुरीवर अवलंबून आहे. याच कुटुंबातील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांवर अवलंबून आहेत. मात्र २०२३-२४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ४३२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यापैकी १ ते ५ वीमध्ये ३५४ शिक्षक, तर गोंडपिपरी तालुक्यात ४५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तसेच ६ ते ८ वी साठी जिल्ह्यात ७८, तर गोंडपिपरीत ५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
शिक्षक नसल्यामुळे “विद्यार्थ्यांचे शिक्षण कोण घेणार?” असा प्रश्न पालकांकडून सतत उपस्थित केला जात आहे. ही अत्यंत गंभीर स्थिती असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी अमर बोडलावार यांनी आमदारांकडे केली.

तसेच शेतकऱ्यांसाठी असलेल्या रोजगार हमी योजनेंतील सिंचन विहीर, घरकुल व इतर वैयक्तिक योजनांची थकित देयके तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना शासनाच्या देयकांमध्ये होत असणाऱ्या विलंबामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. त्यातून मुक्त करण्यासाठी बोडलावार यांनी आग्रही पाठपुरावा केला.

गोंडपिपरी तालुक्यात धान उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. यंदा अतिवृष्टीमुळे काही प्रमाणात धानाचे पीक संकटात सापडले असून जेवढे पीक हातात आले आहे त्याला व्यापारी योग्य दर देत नाहीत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना हक्काचा भाव मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीस धान खरेदीची परवानगी देऊन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

अमर बोडलावार यांच्या भेटीदरम्यान आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सर्व अडचणी गांभीर्याने ऐकून घेतल्या व तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. “लवकरच प्रश्न मार्गी लागतील” असे आश्वासन त्यांनी दिले.

या वेळी बाजार समिती सभापती इंद्रपाल धूडसे, उपसभापती स्वप्नील अनमूलवार, संचालक महेंद्रसिंह चंदेल, चंद्रजित गव्हारे, समीर निमगडे, विजय पेरकावार, मारोती अम्मावार, बालू दिंगलवार, राकेश पून, मनोज वनकर आदी मान्यवर उपस्थित होते.