शेतावर काम करत असताना पडली वीज
जिल्हा संपादक नितेश खडसे
कोरची येथून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या केसाल डाबरी येथे आज दुपारी सुमारे १:०० च्या दरम्यान दुर्दैवी घटना घडली. केसाल डाबरी येथील शेतकरी रघुराम कल्लो यांच्या शेतावर बदलत्या वातावरणामुळे बांधून ठेवलेले धानाचे भारे झाकण्याकरिता गेले असता सरगम सोमनाथ कोरचा वय 17 वर्ष याचा वीज पडून जागीच मृत्यू झाला तर योगेश गावडे व 18 वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे.

तातडीने योगेश गावडे याला रुग्णवाहिकेतून चिचगड येथे येथील रुग्णालयात भरती करण्यात आले व प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला गोंदिया येथे रेफर करण्यात आले.योगेश गावडे हा गोंदिया जिल्ह्यातील गुजूरबडगा येथून आपल्या पाहूनांच्या घरी दिवाळी सणानिमित्त आला होता.
सरगम हा छत्रपती हायस्कूल तथा उच्च माध्यमिक विद्यालय मसेली येथे वर्ग 11 वीत शिक्षण घेत होता. सदर विद्यार्थी मार्च 2025 ला दहावीच्या परीक्षेत विद्यालयातुन प्रथम आला होता.
अचानक सोडून गेल्यामुळे सरगम यांच्या नातेवाईकांमध्ये एकच शोककळा पसरली. सरगमला आई, वडील, दोन भाऊ व आजी असा आप्त परिवार असून सरगम हा घरातील सर्वात लहान मुलगा होता.
महत्त्वाचे म्हणजे आज केसालडाबरी गावात दिवाळीचे सण साजरे केले जात होते आणि या सणाच्या दिवशीच काळाने घात केल्यामुळे संपूर्ण गावात एकच शोककळा पसरली असल्याचे दिसून आले. सरगम चे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय कोरची येथे करण्यात आले असून पुढील तपास कोरची पोलीस करत आहेत.







