संपादक: प्रशांत बिट्टूरवार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूर येथे दलित, शोषित आणि अस्पृश्य समाजाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
या ऐतिहासिक धम्मदीक्षा समारोहाचे अनन्यसाधारण महत्त्व असून, सुमारे तीन लाख लोकांनी रक्ताचा एक थेंब न पडता धम्मक्रांती केली. ही पवित्र दीक्षाभूमी आज जागतिक पातळीवर ओळखली जाते.
मागील अनेक वर्षांपासून धम्मदीक्षा समारोहाच्या निमित्ताने १६ ऑक्टोबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली जात होती, मात्र या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.
ही बाब लक्षात येताच जिल्ह्यातील बौद्ध-आंबेडकरी युवकांनी पुढाकार घेत दिनांक 8/10/25 ला जिल्हाधिकारी यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करण्याचे निवेदन दिले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, सुट्टी जाहीर झाल्यास जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी तसेच बौद्ध आंबेडकरी जनता आपल्या परिवारासह या मंगलदिनी पवित्र दीक्षाभूमीला वंदन करण्यासाठी उपस्थित राहू शकतील.
या शिष्टमंडळात ॲड. राजस खोब्रागडे, सचिन पाटील, ॲड. प्रियंका चव्हाण, कपिल गणवीर, प्रणित तोडे, हर्षल खोब्रागडे आणि एकता भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीची दखल घेत धम्मचक्र अनुप्रवर्तन दिना निमित्त सुट्टी जाहीर करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.