आ.सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री छगनजी भुजबळ यांच्याकडे मागणी
संपादक प्रशांत बिट्टूरवार
चंद्रपूर : धान उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आधारभूत किंमत योजनेअंतर्गत धान खरेदी व नोंदणी केंद्रे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच सुरु करावीत, अशी मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आ.मुनगंटीवार यांनी पत्र लिहून प्रश्न लवकर निकाली काढण्याची विनंती केली असून, लवकरच ते प्रत्यक्ष भेट घेऊनही पाठपुरावा करणार आहेत.
आ. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे की, चंद्रपूर जिल्ह्यात हलके धान 90 दिवसांत तर मध्यम धान 120 दिवसांत तयार होते. सिंचनसुविधा नसलेल्या शेतकऱ्यांकडून प्रामुख्याने या प्रकारचे उत्पादन घेतले जाते. मात्र, गेल्या वर्षी (सन 2024-25) धान खरेदी केंद्रे डिसेंबर महिन्यात सुरु झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना धान साठवून ठेवण्यास अडचण निर्माण झाली. परिणामी अनेकांना खाजगी व्यापाऱ्यांना कमी दराने धान विकावे लागले, ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे की, 2025-26 या वर्षात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये. त्यासाठी नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यातच खरेदी केंद्रे सुरु करावीत. खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आणि विक्रीसाठी सुलभ व पारदर्शक व्यवस्था ठेवावी. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा मोबदला आधारभूत किंमत (MSP) नुसार त्वरीत अदा करण्यासाठी संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री छगनजी भुजबळ यांना केली आहे.
धान खरेदी केंद्रांची संख्या वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच या मागणीबाबत पाठपुरावा करण्यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ यांची प्रत्यक्ष भेट लवकरच घेणार आहे.