प्रतिनिधी गौरव मोहबे
चंद्रपूर:- चंद्रपूरमधील पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश हिवसे यांच्या विरोधात अनेक पत्रकार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. भूमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या घटनेची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा पत्रकार राजू कुकडे यांनी पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर बातमी प्रकाशित केली. या बातमीमुळे संतप्त झालेले अवैध व्यावसायिक, पत्रकारांना धमकावत असल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर, कुकडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता, ठाणेदार योगेश हिवसे यांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही, असाही आरोप आहे. याउलट, मध्यरात्री १ वाजता ठाणेदार हिवसे यांनी स्वतः राजू कुकडे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
या घटनेमुळे संतापलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी एकत्र येत इंडियन डिजिटल मिडिया अँड ब्रॉडकास्ट असोसिएशन, चंद्रपूरच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारले. ज्येष्ठ पत्रकार किशोर पोतनवार यांच्यासह शेकडो पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांना घेराव घालून निवेदन दिले. या निवेदनात, ठाणेदार योगेश हिवसे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा आणि आमदार किशोर जोरगेवार हेही उपस्थित होते.
या प्रकरणी पत्रकारांनी भारतीय संविधानाच्या कलम १९(१)(अ) चा हवाला दिला, जे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार प्रदान करते. याच कलमाचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने प्रेस स्वातंत्र्याला संरक्षण दिले आहे. महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण अधिनियम २०१७ आणि पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ लागू असतानाही, पत्रकारांवर अशा प्रकारे गुन्हे दाखल होणे हे कायद्याचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
या आंदोलनादरम्यान, माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) चाही उल्लेख करण्यात आला. या नियमांनुसार, कुठल्याही डिजिटल न्यूज पोर्टलवर किंवा इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनलवर बातमीच्या संदर्भात थेट गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही. त्याऐवजी, प्रथम संबंधित संपादकाकडे तक्रार नोंदवणे अनिवार्य आहे. संपादकाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास, प्रकरण डिजिटल मीडिया मध्यस्थांकडे जाते, जिथे सुनावणीनंतरच पुढील कारवाईचा निर्णय घेतला जातो. मात्र, ठाणेदार योगेश हिवसे यांनी या नियमांचे उल्लंघन करत थेट गुन्हा दाखल केला, असा आरोप पत्रकारांनी केला आहे.
या प्रकरणात, पत्रकारांनी ठाणेदारावर पत्रकार संरक्षण अधिनियम २०१७ आणि पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इंडियन डिजिटल मिडिया अँड ब्रॉडकास्ट असोसियएशन, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष अनुप यादव, संजय कन्नावार, राजू बिट्टूरवार, दिनेश एकोणकर यांच्यासह अयुब कच्ची आणि इतर सर्व पत्रकार संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
इंडियन डिजिटल मिडिया अँड ब्रॉडकास्ट असोसिएशन चंद्रपूरच्या मागणीनुसार, खालील मुद्दे आहेत:
ठाणेदार योगेश हिवसे यांचेवर पत्रकार संरक्षण अधिनियम २०१७ आणि पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ अंतर्गत गुन्हा दाखल करावा.
ठाणेदाराला तातडीने निलंबित करून त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी करावी.
पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि कायद्याचे संरक्षण सुनिश्चित करावे.
हे आंदोलन चंद्रपूरच्या पत्रकारितेच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरले असून, या प्रकरणावर पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.