सहसंपादक श्याम मशाखेत्री
बॅ. खोबरागडे यांनी भूमिहीनांच्या हक्कासाठी आजीवन केला संघर्ष
‘बॅ. राजाभाऊ खोबरागडे गौरव ग्रंथ’ प्रकाशित व्हावा, अशी मागणी आ. मुनगंटीवार शासनाकडे करणार.
चंद्रपूर, दि. २६- आमचे शिक्षक सांगायचे की, कोळश्याच्या खाणीत हिरे सापडतात; पण मी खाणीमध्ये हिरे सापडलेले कधीच बघितलं नाही. मात्र त्या खाणीच्या परिसरात एक असा रत्न जन्माला आला ज्याने भूमिहीन, शोषित आणि वंचित समाजाच्या जीवनात प्रकाश आणला. ते म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे. बॅ.खोबरागडे हे खऱ्या अर्थाने भूमिहीन व शोषितांचा जीवनाचा आधारस्तंभ ठरले, अशा शब्दांत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बॅ. खोब्रागडे यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
महानगरपालिका पटांगण, गांधी चौक येथे आयोजित त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारत सरकारतर्फे टपाल तिकीट विमोचन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण खोबरागडे,आमदार विजय वड्डेटीवार, आमदार सुधाकरराव अडबाले, आमदार अभिजीत वंजारी, श्रीमती सुधाताई खोबरागडे,पोस्टल विभागाचे अधिकारी एस रामकृष्ण, देशक खोबरागडे,मारोतराव खोबरागडे, किशोर सबाने, प्रतीक डोर्लीकर आदिंची उपस्थिती होती.
आ. मुनगंटीवार म्हणाले, “लंडनमध्ये अनेकांनी बॅरिस्टर पदवी मिळवली; पण बहुतेकांनी ती पदवी धन कमवण्यासाठी वापरली. मात्र बॅरिस्टर खोबरागडे यांनी मनं जिंकण्याचा मार्ग निवडला. त्यांच्याजवळ बँक बॅलन्स नव्हता, पण लोकांच्या डोळ्यांतील अमाप प्रेम व स्नेह होता. जे स्वतःसाठी जगतात त्यांचे स्थान स्मशानात असते, पण जे समाजासाठी जगतात त्यांचे स्थान प्रत्येकाच्या अंतःकरणात असते.”
ते पुढे म्हणाले, राज्यसभेचे उपसभापती म्हणून त्यांनी वंचित आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला. भूमिहीनांचा प्रश्न असो वा अस्पृश्यतेविरुद्धची लढाई, त्यांनी अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आजीवन संघर्ष केला. त्यांचे प्रत्येक भाषण हे दीपस्तंभासारखे आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या टपाल तिकीट प्रकाशनासाठी पुढाकार घेण्याचे भाग्य मला लाभले, हे माझ्यासाठी आयुष्यभराचे समाधान आहे.
या कार्यक्रमात त्यांनी खोबरागडे यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. “बॅरिस्टर खोबरागडे हे फक्त एका कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे होते. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने महाराष्ट्र शासनाने एक ‘गौरव ग्रंथ’ प्रकाशित करावा. या ग्रंथाचे प्रकाशन चंद्रपूरमध्ये होऊन तरुण पिढीला ‘जीवन कसे जगावे’ याचा मंत्र मिळेल,” असे ते म्हणाले. आ. मुनगंटीवार यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.