Home Breaking News एटापल्ली-जिवनगट्टा गावांना स्वतंत्र वीज फिडर…

एटापल्ली-जिवनगट्टा गावांना स्वतंत्र वीज फिडर…

214

प्रतिनिधी/रेगडी

नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार व राहुल कुळमेथे यांच्या प्रयत्नांना यश

एटापल्ली, ता. 24 :

एटापल्ली व जिवनगट्टा गावांसाठी स्वतंत्र वीज फिडर मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन नगरपंचायतचे पाणीपुरवठा सभापती नामदेव हिचामी व नगरसेवक जितेंद्र टिकले यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले.

या कामासाठी नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार व राहुल कुळमेथे यांनी दिनांक 30 एप्रिल 2025 पासून 18 जून 2025 पर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. जवळपास वर्षभराच्या अखंड प्रयत्नांनंतर अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे.

३३/११ केव्ही एटापल्ली उपकेंद्रातून सुरू होणाऱ्या या नवीन ११ केव्ही फिडरसाठी वार्षिक आदिवासी विकास योजनेतून सन 2024-25 मध्ये तब्बल 56.74 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे एटापल्ली व जिवनगट्टा गावांना स्वतंत्र व अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे.

या कामाच्या मागणीसाठी एक वर्षापूर्वी CPIचे जिल्हा सचिव सचिन मोतकुरवार, व्यापारी संघटना अध्यक्ष महेश पुल्लूरवार तसेच भाजपाचे जिल्हा सचिव विजय नल्लावार यांनी स्वाक्षरी करून पाठिंबा दिला होता.

भूमिपूजन प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख अक्षय पुंगाटी, अमोल गजाडीवार राकेश तेलकुंटलवार, महावितरणचे कनिष्ठ अभियंता थेरे साहेब, कर्मचारी किशोर दुर्वा, शुभम बंडावार, राजेश कुजूर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांनी सांगितले की, “नवीन वीज फिडरमुळे परिसरातील नागरिकांना अखंड, दर्जेदार वीजपुरवठा होणार असून वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण झाली आहे.”

Don`t copy text!