धानोरा येथे नागरिकांच्या विविध समस्यांच्या व राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन…

106

सहसंपादक श्याम मशाखेत्री

धानोरा तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांच्या मागण्यांसाठी व धानोरा ते मुरूमगांव राष्ट्रीय महामार्गाच्या अत्यंत खराब अवस्थे बाबत व त्वरित दुरुस्ती बाबत गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे *लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान,* निरीक्षक गडचिरोली विधानसभा संदेशजी सिंगलकर आणि गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे व तालुकाध्यक्ष प्रशान्त कोराम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत येरकड गावात राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले.*
धानोरा तालुक्यातील नागरिक व शेतकरी यांच्या मूलभूत समस्यांकडे शासन व प्रशासनाने केलेले संपूर्ण दुर्लक्ष आता जनतेला असह्य झाले आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था, अपूर्ण सिंचन सुविधा, विस्कळीत आरोग्य व्यवस्था, शिक्षण क्षेत्रातील दुर्लक्ष, तसेच रोजगाराच्या संधींचा अभाव यांसारख्या गंभीर प्रश्नांवर कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. शासन केवळ कागदावर आणि आश्वासनांपुरते मर्यादित राहिल्यामुळे जनतेत तीव्र रोष निर्माण झाला आहे.
या सर्व प्रश्नांचा निषेध म्हणून ता. धानोरा-येरकड येथे मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन शासनाविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी शासनाची निष्क्रियता, प्रशासनाचे ढिसाळ धोरण आणि जनतेच्या मागण्यांकडे केलेले सततचे दुर्लक्ष याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान मान्यवारांनी ठामपणे सांगितले की, रस्ते, शालेय बस सेवा, शेतकऱ्यांना वनपट्टे, रब्बी हंगामाचे चुकारे, प्रोत्साहन राशी, सुरळीत विद्युत पुरवठा, स्मार्ट मीटरचा विरोध, जंगली हत्ती व प्राणी नियंत्रण, जखमींना मदत, तसेच ताप, डेंग्यू, मलेरिया व टायफॉईडसाठी आरोग्य शिबिरे या मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा काँग्रेसने दिला.
यावेळी माजी जि. पं. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ऍड. कविता मोहरकर,किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, लालाजी धुर्वे, सौं.रुकमाबाई धुर्वे, सौं.शेवंता हलामी, कुलदीप इंदूरकर, शेरखान पठाण, लक्षमण डोकरमारे, सखाराम नैताम, भास्कर मेश्राम, शालिक पर्सा, एकनाथ काटेंगे, दिवकर उशेंडी, मादगू आतला, काँग्रेस पदाधिकारी, शेतकरी, मजूर, युवक, कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.