चीफ एडिटर प्रशांत शाहा
चंद्रपूर :- नुकतेच दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवार १६ सप्टेंबरला ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील सायगाटा भागातील लाखापूरच्या जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या लाखापूर येथील सुनील उर्फ प्रमोद बाळकृष्ण राऊत या गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. अश्यातच आता आज, गुरुवार १८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास शेतातील धान निंदणी करणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेस वाघाने उचलून नेत ठार केल्याची घटना चिमूर तालुक्याच्या लावारी गावात उघडकीस आली. प्रकरणी गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत वनविभागाच्या वाहनांना घेराव घातल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विद्या कैलास मसराम वय ४० वर्षे, रा. लावारी, ता. चिमूर असे वाघाने ठार केलेल्या महिलेचे नाव आहे.
चिमूर तालुक्याच्या शंकरपूरपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लावारी गावातील कैलास मसराम यांच्या शेतात त्यांची पत्नी विद्या व काही महीलांद्वारे आज गुरुवारी धान निंदणीचे काम सुरू होते. काही महिला समोरच्या बांधीत होत्या, तर विद्या मसराम ह्या मागील बांधीत निंदण करत होत्या. निंदण करत असतांनाच वाघाने अचानकपणे त्यांच्यावर झडप घालून ठार केले व दूरवर उचलून नेले.
सदरची घटना समोरच्या बांधीत निंदण करत असलेल्या महिलांच्या जराही लक्षात आली नाही. महिलांनी विद्या मसराम यांना आवाज दिला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी काहीकाळ शोधाशोध केली. काही वेळातच विद्या मसराम यांचे पती शेतावर पोहचले असता महिलांनी आपबिती सांगितली. त्यानुसार कैलास मसराम यांनी शोधाशोध केली असता काही अंतरावर पत्नी मृतावस्थेत आढळून आल्याने सदरची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वनविभागास माहिती दिली. वन विभागाने मृतदेह चिमूर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यानंतर गावकऱ्यांनी रस्त्यावर एकत्र येत घटनेचा निषेध नोंदवत संताप व्यक्त केला. त्यामुळे घटनास्थळी काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, भिसीचे ठाणेदार मंगेश भोंगडे आदी अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने नागरिक शांत झाले.







