राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे विविध मागण्यांसाठी गडचिरोलीत बेमुदत संप…

130

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे विविध मागण्यांसाठी गडचिरोलीत बेमुदत संप; काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची भेट व जाहीर पाठिंबा

सहसंपादक श्याम मशाखेत्री

गडचिरोली :
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी दि. 19 ऑगस्ट 2025 पासून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे बेमुदत संप सुरू आहे. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व संपाला जाहीर पाठिंबा दिला. तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी शक्य ते प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले.

गडचिरोलीसारख्या अति दुर्गम जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी कोरोना सारख्या महामारीतही अनेक कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता सेवा दिली. अजूनही अनेक गावांत रस्ते पोहोचले नसताना हे कर्मचारी घराघरांत जाऊन सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवत आहेत.

जिल्ह्यात डेंगू, मलेरिया, टायफॉईडसारख्या आजारांचे रुग्ण वाढत असून आरोग्य व्यवस्था विस्कळीत होत आहे. अशा परिस्थितीत कर्मचारी संपावर गेल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. राज्याचे मुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाही शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या रास्त मागण्यांसाठी व न्याय हक्कासाठी संप करावा लागत आहे, ही शोकांतिका आहे. शासनाने व स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याकडे लक्ष देऊन तातडीने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या रास्त असणाऱ्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.

तसेच, आरोग्य व्यवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनीही प्रयत्न करावेत, असे आवाहन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

या वेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासोबत गडचिरोली तालुका काँग्रेस अध्यक्ष वसंत राऊत, श्रीनिवास ताटपल्लीवार यांसह इतर काँग्रेस पदाधिकारी व संपकरी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.