प्रतिनिधी सतीश कुसराम
गडचिरोली : माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या गडचिरोली येथील जनता तक्रार दरबारात शहरातील विविध वार्डांतील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आपल्या वार्डातील मूलभूत समस्यांबाबत निवेदन दिले.
या निवेदनात प्रामुख्याने अवैध दारू विक्री, रस्त्यांची दुरवस्था, वारंवार खंडित होणारा लाईट पुरवठा, मोकाट जनावरांचा त्रास, सांडपाण्याची नाली, गार्डनची दुरवस्था, शहिद परिवारातील अनुकंपा नौकरीचे प्रश्न अशा अनेक तातडीच्या प्रश्नांचा समावेश होता. महिलांनी स्पष्टपणे सांगितले की या समस्या दीर्घकाळापासून प्रलंबित असून त्यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.
या जनता दरबारात झालेल्या चर्चेत महिलांनी अवैध दारू विक्रीमुळे कुटुंबात निर्माण होणारे प्रश्न, तरुण पिढीवर होणारे दुष्परिणाम आणि महिलांना भेडसावणाऱ्या सामाजिक अडचणींबाबत मुद्देसूद मांडणी केली. तसेच रस्त्यांवरील खड्डे, मोकाट जनावरांचा उपद्रव, सांडपाण्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता, वीज खंडित होण्याचा त्रास याबाबतही महिलांनी रोखठोक मत व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी महिलांच्या निवेदनाची गंभीर दखल घेतली असून संबंधित प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच “महिलांचा सहभाग हा स्थानिक समस्या सोडवण्यासाठी प्रभावी ठरणार आहे, म्हणून अशा प्रकारच्या तक्रार दरबारात महिला सक्रियपणे पुढे याव्यात,” असे आवाहनही त्यांनी केले.
⛔गडचिरोली शहरातील महिलांनी पुढाकार घेऊन आपल्या वार्डातील प्रश्न मांडल्यामुळे प्रशासनावर समस्या सोडवण्याचा दबाव निर्माण झाला आहे.







