खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत कोरपना येथे विकासकामांचा आढावा; अनेक ज्वलंत प्रश्नांवर चर्चा…

144

संपादक प्रशांत बिट्टूरवार:

*खताची टंचाई, निकृष्ट रस्ते आणि अपूर्ण कामांवर महत्त्वपूर्ण बैठक*

चंद्रपूर : कोरपना येथील तहसील कार्यालयात आज खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध ज्वलंत प्रश्नांवर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत स्थानिक नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करून त्यांच्या निराकरणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा सूचना करण्यात आल्या.

जिल्ह्यात सध्या खताची तीव्र टंचाई असून, विशेषतः युरिया उपलब्ध नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून देण्यात आली. ऑनलाईन अर्जांमध्ये कागदपत्रांच्या साईजची मर्यादा असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असून, कृषी सहायकांनी यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

विकासकामांच्या स्थितीवरही सकारात्मक चर्चा झाली. पॉवर हाऊस ते नंदाफाटा पर्यंतचे काम अद्याप अपूर्ण असून, कोरपना तालुक्यातील रस्त्यांचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घरकुल धारकांना जवळच्या घाटातून रेती उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच, अनेक अपूर्ण बांधकामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय, बँक ऑफ इंडियामध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.

या सर्व समस्यांवर बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, “नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. या सर्व समस्यांवर तात्काळ उपाययोजना करून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.”

या बैठकीला माजी आमदार सुभाष धोटे, उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, तहसीलदार पल्लवी आखरे, विस्तार अधिकारी पाल, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, काँग्रेस तालुका अध्यक्ष उत्तम पेचे, पोलीस निरीक्षक कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अडपेवार, काँग्रेस नेते सुरज ठाकरे, नितीन बावणे, आशिष देरकर, शैलेश लोखंडे, अशोक बावणे, आणि संतोष महाडोळे यांची उपस्थिती होती.