प्रतिनिधी/प्रीतम गग्गुरी:
धर्म-जातिभेद विसरून गावकऱ्यांचा सामूहिक सहभाग; सांस्कृतिक वारशाला उजाळा…
केळापूर (जि. यवतमाळ):
तालुक्यातील मोहदरी या छोट्याशा पण सामाजिक ऐक्याचं मोठं उदाहरण ठरलेल्या गावात पारंपरिक उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला. रंगीबेरंगी सजावट, पारंपरिक वेशभूषा आणि सजवलेल्या बैलांच्या मिरवणुकीनं सारा परिसर न्हालाच.सणाच्या निमित्ताने गावातील सर्व जाती-धर्माचे नागरिक एकत्र आले. लहानथोर, महिलावर्ग आणि तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग अनुभवायला मिळाला. गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीनं बैलांचं पूजन करत आपल्या कृषीसंस्कृतीला अभिवादन केलं.गावचे सरपंच बाबाराव धुर्वे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सामाजिक एकोप्याचं महत्त्व अधोरेखित केलं. “ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे,” असं ते म्हणाले.
सजवलेले बैल, पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, आनंदी वातावरण आणि गावकऱ्यांचा आपुलकीचा सहभाग यामुळे मोहदरीचा बैलपोळा केवळ एक सण न राहता, एकात्मतेचा उत्सव ठरला.हा सण म्हणजे नुसतं बैलपूजन नाही, तर सहजीवनाचं, सौहार्दाचं आणि सांस्कृतिक जपणुकीचं सशक्त प्रतीक आहे मोहदरीनं हे पुन्हा सिद्ध केलं आहे.