सिद्धार्थ दहागावकर
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
लाठी : लाठी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा सकमुर (चेकबापूर) येथे दारूबंदी करण्यासाठी महिलांनी एल्गार पुकारल्याने दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी उप पोलीस स्टेशन लाठी येथील ठाणेदार निशा भुक्ते यांनी दारूबंदी संबंधी कार्यवाही करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय सकमुर (चेकबापूर) येथे ग्रामस्थांची बैठक बोलाविली होती.
महिलांच्या दारूबंदीच्या हाकेला प्रतिसाद देत ठाणेदार निशा भुक्ते यांनी अवैध दारू,अवैध धंदे तात्काळ बंद करून गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे बैठकीत आवाहन केले. अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची ताकीद ठाणेदार निशा भुक्ते यांनी दिली.
आयोजित बैठकीत ग्रामपंचायतचे उपसरपंच जीवन अलोने, तंटामुक्त समिती अध्यक्ष शाहीराज अलोने, ग्रामपंचायत सदस्य संतोष मुगलवार, दिलीप मुंजनकर, सिद्धार्थ दहागावकर, विनोद अलोने, शिवाजी काळे, लक्ष्मण झाडे आणि ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सकमुर (चेकबापूर) येथे दारूबंदी करण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा याप्रसंगी उपपोलीस स्टेशन लाठी च्या ठाणेदार निशा भुक्ते यांनी दिला.







