चंद्रपूर:- मौजा पायली गावातील नागरिकांनी आपल्या मूलभूत मागण्या संदर्भात आजपर्यंत नियमानुसार अनेकदा शासन स्तरावर निवेदन सादर केले, ग्रामपंचायत येथे देखील लेखी निवेदन दिले परंतु स्थानिक सचिवांतर्फे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याने शेवटी अन्याय होत असल्याचा भावनेतून आज पायली गावातील ग्रामस्थांनी आपल्या मुलाबाळांसह ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
मौजा पायली येथील १११ लोकांनी या गावातील मालमत्ता रजिस्टर्ड खरेदी/विक्री केली. याकरिता शासन नियमानुसार कागदपत्रे सादर करीत शुल्क देखील भरले आहे. मात्र रजिस्ट्री झाल्यानंतर जेव्हा ग्रामपंचायत येथे फेरफार करण्याकरिता अर्ज सादर केले गेले त्यादिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयातील सचिवांतर्फे टाळाटाळ करण्यात येत आहे. कोणतेही कारण नसताना आज जवळपास १ वर्षापासून फेरफार प्रक्रिया प्रलंबित ठेवली आहे. यामुळे गावकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
यासंदर्भात गावातील नागरिकांनी वारंवार लेखी पाठपुरावा केला, त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी चंद्रपू यांच्या निर्देशानुसार दिनांक २४ डिसेंबर २०२४ ला मौजा भटाडी येथील विस्तारित खुली कोळसा खाणीमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार मौजा पायली गावठाण जमिनीचा समावेश असल्यामुळे सदर गावाचे पुनर्वसन व पुनस्थापना करणे आवश्यक असल्याने दिनांक ०२ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता मा. उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, चंद्रपूर यांचे दालनात बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला मा. नायब तहसीलदार, मा. गट विकास अधिकारी, वेकोली चे मा.महाप्रबंधक, वेकोली चे मा. राजस्व अधिकारी, मा. तलाठी, पायली भटाडी गावाचे मा.सरपंच/सचिव यांचेसह पुनर्वसन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत वेकोली चे प्रतिनिधी व पुनर्वसन समिती सदस्यांच्या वतीने चर्चे दरम्यान विविध विषयांवर मुद्दे उपस्थित केले. त्यावेळी ग्रामपंचायतीची भूमिका मांडताना भाटाडी पायली ग्रामपंचायत चे मा. सचिव यांनी सदर प्रकरणात ग्रामपंचायत दर ४ वर्षाला फेर आकारणी करते. त्यानुसार जेव्हा वेकोली ने सेक्शन ४ ते ७ लावला त्या कालावधी मध्ये फेर आकारणी प्रलंबित राहिली. त्यावेळी मौजा पायली भटाडी ग्रामपंचायत येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या मार्फत पाठविलेल्या पत्राच्या संदर्भ देत फेरफार व रजिस्ट्री करण्यात आला होता परंतु त्यानंतर दिनांक ०१ एप्रिल २०२३ पासून फेरफार प्रक्रिया पुर्ववत करून ग्रामपंचायत चे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने या १११ लोकांच्या रजिस्ट्री फेरफार घेण्यात आले व त्याकरिता ग्रामसभेत तसा ठराव पारित करण्यात आला व ते झालेले व्यवहार ग्राह्य धरण्यात यावे असे खुद्द ग्रामपंचायत चे मा. सचिव यांनी मा. उपविभागीय अधिकारी यांच्या समक्ष सांगितले व याबाबत असलेल्या बैठकीच्या लेखी इत्तिवृत्तात नमूद करण्यात आले आहे.
मा. उपविभागीय अधिकारी श्री संजय पवार साहेब यांच्या स्वाक्षरीने सार्वजनिक करण्यात आलेल्या बैठकीच्या इत्तिवृत्तात मा. वेकोली चे अधिकारी, पुनर्वसन समितीचे अध्यक्ष व सदस्यांसह ग्रामपंचायत चे मा. सचिव यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चे नुसार सदर प्रकरणात नियमानुसार बेस लाईन सर्व करण्यात येईल याबाबतचा अभिप्राय मा. उपविभागीय अधिकारी यांनी दिला आहे. असे असताना देखील ग्रामपंचायत चे सचिव कोणत्याही प्रक्रियेला टाळाटाळ करीत आहेत. एकीकडे मा. उपविभागीय अधिकारी यांच्या समक्ष १११ लोकांच्या रजिस्ट्री व फेरफार घेण्यात आल्याचे खोटे सांगून मा. उपविभागीय अधिकारी यांची दिशाभूल करून एका अर्थाने फसवणूकच केली असल्याचे निदर्शनास आले आहे.
व म्हणून तत्काळ ग्रामपंचायत चे सचिव यांच्येवर कारवाई करावी व दिनांक ०२ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत नंतर मा. उपविभागात अधिकारी यांनी दिलेल्या लेखी अभिप्रायानुसार कारवाई करीत ज्या १११ लोकांनी शासन नियमानुसार रजिस्ट्री केली आहे त्या सर्व नागरिकांचे फेरफार घेण्यास सुरुवात करावी. या मागणीला घेऊन आज गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. तरी जोपर्यंत गावकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत सदर आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.







