लाच प्रकरणात सापडलेल्या अधिकाऱ्यांच्‍या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करा आमदार सुधाकर अडबाले यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

551

चंद्रपूर : लाच प्रकरणात सापडलेल्या चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्‍या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करा, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्‍याचे गृहमंत्री, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क मंत्री यांच्याकडे केली आहे.

बियरशॉपीचा नवा परवाना देण्यासाठी दीड लाखांची मागणी करणारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे आणि कार्यालय अधीक्षक अभय बबनराव खताळ हे लाच प्रकरणात अडकले. यातील अधीक्षक पाटील अजूनही फरार असून खारोडे अाणि खताळ यांना लाच स्‍वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवून तीन वर्षांचा काळ लोटला. याकाळात नव्‍या दुकानांना परवाना देण्यासाठी आणि मासिक हप्‍तामधून या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दारू विक्रेत्‍यांकडून कोट्यवधी रूपयांची वसूली केली आहे. या तीन वर्षांच्या काळात या कार्यालयाकडून दिलेल्‍या परवान्‍यांची चौकशी करण्यात यावी. तसेच येथील सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.

लाच प्रकरणातील अधीक्षक संजय पाटील अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नसून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अधीक्षक पाटील यांच्या कोल्‍हापूर येथील तीन घरांवर छापा टाकला. यात २८ तोळे सोन्‍याचे दागिने, कोट्यवधी रूपयांची रोकड, आलीशान कार अाणि महागड्या दुचाकी या पथकाने जप्‍त केल्‍या आहेत.

चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयातील अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे आणि कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी बेकायदेशीर मार्गाने गोळा केलेल्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी व फरार असलेले अधीक्षक पाटील यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्‍याचे गृहमंत्री, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क मंत्री, गृह विभाग सचिव, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे आयुक्‍त यांच्याकडे केली आहे.