चंद्रपूर : जिल्ह्यात शेळी व मेंढी आदी पशुधनाची संख्या एक लाखाच्या वर पोहोचली आहेत. पावसाळ्यात पास असल्याशिवाय संबंधितांना चराई केंद्र व चराई क्षेत्रावर जाता येत नाही. सध्या या पाळीव पशुधनासाठी दोन दिवसांचा पास आहे. त्यात उपासमार होणार असल्याने पाच दिवसांचा पास करावा, अशी मागणी धनगर समाज शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांच्याकडे केली.
शेळी व मेंढी पालनावर उदरनिर्वाह करणारे शेकडो कुटुंब आहेत. या कुटुंबांच्या पशुधनाला चराईसाठी जंगलावर अवलंबून राहावे लागते. पावसाळ्यात शेतात पिके राहत असल्याने चराईचा प्रश्न गंभीर होतो.
त्यामुळे जंगलात चराईला नेण्यासाठी वन विभागाकडून पशुपालकांना पास दिले जाते. मात्र, त्याचा कालावधी दोन दिवसांचा असतो. यात काहीही साध्य होत नाही.
शेळी व मेंढी जनावरांना पाससाठी व त्यांना स्थलांतरित करण्यासाठी दोन दिवसाऐवजी पाच दिवसांचा कालावधी करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळात धनगर जमात सेवा मंडळचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भंगाराम तळोधी येथील भानेश येगेवार, मल्लाजी येगेवार, गणपती येगेवार, तिरुपती येगेवार, बी. कनलवार, प्रवीण गिलबिले, मयूर भोकरे, पवन ढवळे, डॉ. यशवंत कन्नमवार, राजेश्वर पारेवार आदींचा सहभाग होता







