Homeचंद्रपूर१४ व्या वित्त आयोगाच्या ८ लाख ४० हजारांतून खेळला ऑनलाइन जुगार; जुनासुर्लातील...

१४ व्या वित्त आयोगाच्या ८ लाख ४० हजारांतून खेळला ऑनलाइन जुगार; जुनासुर्लातील धक्कादायक घटना

चंद्रपूर : ग्रामपंचायत जुनासुर्ला येथील संगणक चालकाने ग्रामपंचायतीच्या १४ वा वित्त आयोग बँक खात्यातील शिल्लक असलेला निधी थेट स्वतःच्या खात्यात वळती करून ऑनलाइन जुगारात उडविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

या घटनेने जिल्हा परिषद पंचायत विभागात खळबळ उडाली आहे.

१४ वा वित्त आयोगाचा कालावधी संपला. मात्र, जुनासुर्ला ग्रामपंचायतीचा ८ लाख ४० हजार रुपयांचा निधी अखर्चित होता. शासनाने या आयोगातील निधी खर्च करण्यास एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. याच संधीचा फायदा घेत ग्रामपंचायतीमधील संगणक चालकाने सरपंच व ग्रामसचिवाच्या डीएससीचा गैरवापर केला आणि १४ वा वित्त आयोगातील ८ लाख ३९ हजार रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने आपल्या स्वत:च्या बँकखात्यात वळती केला. यातील २३ हजार रुपयांचे देयक रद्द झाले. मात्र, खात्यात वळती केलेल्या ८ लाख १६ हजारांची रक्कम ऑनलाइन जुगारात उडवली. ही बाब सरपंच व सचिवांच्या लक्षात येऊनही त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत जात असून या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार कोण ? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

अशी काढली रक्कम

ग्रामपंचायतीच्या खात्यातून २९ मार्च रोजी १ लाख ६७ हजार, २८ मे २ लाख ३३ हजार, ६ जूनला २ लाख, १५ जून १ लाख ९२ हजार, ५ ऑगस्ट २३ हजार, ८ ऑगस्टला २४ हजार असे एकूण ८ लाख ३९ हजार रुपयांचा १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट स्वतःच्या बँक खात्यात वळती केला. मात्र, यापैकी २३ हजारांचे देयक रद्द झाले.

सचिव व सरपंच अनभिज्ञ कसे ?

१४ वित्त आयोगातील पेमेंट हा सरपंच आणि ग्रामसचिवांच्या डीएससीचा वापर करून ऑनलाइन पीएफएमएस प्रणालीद्वारे करावयाचा असतो. डीएससी ठेवण्याची जबाबदारी सरपंच व ग्रामसचिवाची असते. संगणक चालकाने डीएससीचा वापर करून आपल्या खात्यात रक्कम वळती कशी केली ? मार्चपासून काढलेल्या रकमेचा जमा खर्च सचिवांनी मासिक सभेत का दिला नाही की मासिक सभाच झाली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रकरणाची सखोल चौकशी करून सरपंच व सचिवावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शेती विकून भरले पैसे

पोलिस कारवाईच्या भीती व बदनामीपासून वाचण्यासाठी सरपंच व गावातील काही नेत्यांनी संगणक चालकासोबत तडजोड केल्याची चर्चा आहे. नंतर केंद्रचालकाने शेती विकून ८ लाख १६ हजार रुपयांचा भरणा ग्रामपंचायतीच्या खात्यात करून या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!