जुन्या भांडणातून केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू ; पळून गेल्याने मुलाचा जीव वाचला

730

चंद्रपूर – जुन्या वादातून एका 45 वर्षीय महिलेला काठीने जोरदार मारहाण करुन खून केला. त्यानंतर स्वतःच्या आईला वाचविण्यासाठी धावलेल्या मुलालाही मारहाण केली.

परंतु तो पळून गेल्याने त्याचा जीव वाचला. पण तो जखमी झाला आहे. ही घटना चिमूर तालुक्यातील आंबोली या गावात शुक्रवारी घडली. या थरारक घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. शारदा दयाराम वाघ असे मृत महिलेचे नाव आहे.

आंबोली निवासी विधवा महिला शारदा दयाराम वाघ व आरोपी गोपीचंद शिवरकर याचे घर शेजारी आहे. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास विधवा महिलेचा मुलगा घरी खड्डे करित असताना आरोपीने भांडण सुरु केले. जुनाच वाद असल्यामुळे आरोपीने मुलाला काठीने मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तो जखमी झाला. आरोपी मुलाला जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करताच मुलाने घटनास्थळावरून पळ काढला. त्याच ठिकाणी मुलाची आई बसली असताना तिने आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला काठीने जोरदार मारहाण केली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. तिला रूग्णालयात दाखल केले असता मृत्त घोषित करण्यात आले.

आरोपीने आंबोली येथील बेघर वस्तीमध्ये दहशत निर्माण केली आहे. या आधीही आरोपीचे महिलेसोबत भांडण झाले आहे. काही दिवसापूर्वी आरोपीच्या दहशतीमुळे विधवा महिला मुलाला घेऊन शेजाऱ्याच्या घरी झोपायला जायची. त्यामुळे शारदा व तिचा मुलगा दहशतीखाली राहत होते.

या घटनेची माहिती आंबोलीचे पोलीस पाटील थाटकर यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी गोपीचंद शिवरकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भिशी पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश राऊत करत आहेत.