Homeचंद्रपूरओबीसी वसतीगृह,स्वाधार योजना त्वरित सुरु करा अन्यथा आत्मदहन करणार -प्रा.अनिल डहाके

ओबीसी वसतीगृह,स्वाधार योजना त्वरित सुरु करा अन्यथा आत्मदहन करणार -प्रा.अनिल डहाके

चंद्रपूर – स्वातंत्र्याची ७५ वर्ष झाली परंतु अजूनही ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय ओबीसी वसतीगृह नाही. एस.सी, एस. टी. विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्याना आर्थिक मदत करणारी स्वाधार योजना लागू नाही. त्यामुळे शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना असंख्य अडचणीचा सामना करावा लागत आहे. हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्याची घोषणा केली. परंतु अमलबजावणी करणारा शासकीय आदेशच काढला नाही.

महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृह सुरु करण्यासंदर्भात शासन निर्णय काढला. परंतु ३० जून २०२३ पासून नविन सत्राला सुरुवात होत आहे. १० वी, १२ वी चे निकाल लागले आहेत. परंतु अजूनही वसतीगृह सुरु करण्यासंदर्भात सरकारच्या, प्रशासनाच्या हालचालींना वेग दिसत नाही. कित्येक विद्यार्थी वसतीगृह सुरु होतील या आशेने शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेतला आहेत. ओबीसी विद्यार्थी वसतीगृह सुरु न झाल्यास कित्येक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू शकते. शिक्षण सोडून मोलमजुरी करावी लागू शकते. विद्यार्थी खचून आत्महत्याही करू शकतात.

अतिशय बिकट परिस्थितीत ओबीसी विद्यार्थी सापडला आहे. या सत्रात त्वरीत ओबीसी मुलांचे, मुलींचे वसतीगृह जिल्हास्तरावर सुरु करावे तसेच स्वाधार योजनेची अंमलबजावणी करावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,इतर मागासवर्गीय आयोग,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, सचिव इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले आहे.

ओबीसी वसतीगृह व स्वाधार योजना सुरु न झाल्यास आम्ही सामूहिक आत्मदहन करणार व त्याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी मंत्रालय मंत्री, व आपले सरकार राहील असा इशारा ओबीसी सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष,प्रा. अनिल डहाके यांनी दिला. यावेळी जिल्हा महासचिव अड. विलास माथनकार, भाविक येरगुडे, रंजीत डवरे, विनय धोबे, प्रा. राहुल भोयर, प्रा. निलेश बेलखेडे, कुसुमताई उदार, चंद्रकांत धांडे, प्रा. नामदेवराव मोरे, वसंत वडस्कर, अवधूत कोटेवार, प्रलय म्हशाखेत्री, आकाश कडूकर, सुरज पी. दहागावकर आणि इतर ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी वाट पाहावी लागत आहे. निवेदने देवून, आंदोलने करूनही सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. या नवीन सत्रात ओबीसी वसतीगृह सुरु होईल या आशेने शहरातील महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ७२ ओबीसी वसतीगृह सुरु झाले नाही तर असंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात.
प्रा.अनिल डहाके
जिल्हाध्यक्ष ओबीसी सेवा संघ,चंद्रपूर

शेतकरी,शेतमजुर,कामगारांची ग्रामीण भागातील ओबीसी विद्यार्थी हुशार,होतकरू आहेत परंतु त्यांना शहराच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नाही म्हणून अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. ओबीसी वसतीगृह वेळेत सुरु न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल.
ॲड.विलास माथनकर
जिल्हा महासचिव, ओबीसी सेवा संघ,चंद्रपूर

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!