चंद्रपूर लोकसभेच्या पोटनिवडणूकीची तयारी करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

1137

चंद्रपूर:काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभेची संभाव्य पोटनिवडणूक केव्हावी जाहीर होवून शकते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून निवडणूक घेण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची माहिती मागविली आहे. त्यामुळे चंद्रपूर लोकसभेत केव्हाही निवडणूक लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान सदस्य बाळू नारायण धानोरकर यांचे निधन झाल्यामुळे सदर रिक्त झालेल्या जागेकरिता केंद्रिय निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच, सदर निवडणुकीचे संचलन करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे निवडणूक साहित्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे शपथपत्र,नामनिर्देशन पत्र, फार्म ए व बी, निवडून आलेल्या उमेदवाराला द्यावयाचे प्रमाणपत्र, बोटाला लावायची शाई, सुधारित पिंक पेपर सील, सुधारित ग्रीन पेपर सील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची पोट निवडणूक जाहीर झाल्यास आपल्याकडे पुनर्वापर करण्याजोगे निवडणूक साहित्य आहे किंवा नाही याबाबत तात्काळ आढावा देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी अ.अ.खोचरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणूकीच्या कामाला वेग आला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा यांना विचारणा केली असता आयोगाचे पत्र मिळाले आहे. निवडणूक घेण्याची काय तयारी आहे हे आयोगाला लवकर कळवणार असल्याचेही सांगितले.