Homeचंद्रपूरकार, तरुणी आणि नंबर प्लेट ; संतोषसिंग रावत गोळीबार प्रकरणी नेमके काय...

कार, तरुणी आणि नंबर प्लेट ; संतोषसिंग रावत गोळीबार प्रकरणी नेमके काय घडले जाणून घ्या…

चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंग रावत यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यासह त्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे. राजविर यादव आणि अमर यादव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पैशाच्या देवाणघेवाणच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सहा ते सात वर्षांपूर्वी संतोषसिंग रावत यांनी वेकोली कोळसा खाणीत नोकरी लावून देतो म्हणून आरोपींकडून सहा लाख रुपये घेतले होते, मात्र ते त्यांनी परत केले नाही. त्यामुळे आपण रावत यांचा खून करण्याचा कट रचल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र गोळीबार प्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू आहे.

काय आहे गोळीबाराची घटना : जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत हे 11 मेच्या रात्री दुचाकीने आपल्या घरी जात होते. यावेळी कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. या जीवघेण्या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. जिल्ह्यात एखाद्या नेत्यावर गोळीबार केल्याची ही पहिलीच घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती.

तपासासाठी 15 पथकांची नेमणूक : अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरण असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 15 तपास पथके नेमण्यात आले होते. या पथकाद्वारे आरोपींचा कसून शोध घेतला जात होता. मात्र कोणताच सुगावा मिळून येत नव्हता.

विजय वडेट्टीवारांचा पोलिसांना अल्टीमेटम : संतोषसिंग रावत हे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक आहेत. वडेट्टीवार यांच्या राजकीय खेळीनेच रावत चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष बनू शकले. त्यामुळे या हल्ल्याच्या तपासात वडेट्टीवार यांनी आग्रही भूमिका घेतली. त्यांनी 25 मे पर्यंतचा वेळ पोलीस प्रशासनाला दिला होता. या दरम्यान आरोपींना पकडले नाही, तर आपण जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. वडेट्टीवार हे सातत्याने या संदर्भात लक्ष लावून होते.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती : गोळीबार प्रकरणी 15 पथकांच्या नेमणुकीनंतरही काही ठोस पोलिसांच्या हाती लागले नाही. या प्रकरणात आरोपींना शोधून काढण्यासाठी मोठा दबाव असल्याने या प्रकरणाचा तपास गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे सोपविण्यात आला. सुशीलकुमार नायक यांनी अवघ्या दोन दिवसात गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली.

असा लावला पोलिसांनी तपास : आरोपी ज्या कारमध्ये आले होते त्या कारची नंबर प्लेट बोगस होती. नायक यांनी आपला तपास या दिशेने वळवला. नंबर प्लेट बनवून देणाऱ्या दुकानांमध्ये जाऊन असे कोणी करण्यासाठी आले का याबाबत चौकशी करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे पथकाने चंद्रपूर शहरात अशा दुकानांमध्ये जाऊन दुकान मालकांची कसून चौकशी केली. यात सराफा लाईन जवळील एका दुकानात विचारपूस केली असता, त्या दुकानदाराने अशी नंबर प्लेट बनवण्यासाठी कोणीही आले नसल्याचे सांगितले. मात्र, जर आढळून आले तर मग काही खरे नाही अशी तंबी देऊन पोलीस निघून गेले. यानंतर या दुकानदाराने स्वतः पोलिसांना फोन करुन अशी नंबर प्लेट आपल्याकडे बनवण्यासाठी एक व्यक्ती आला असल्याचे सांगितले.

हा व्यक्ती कोण आहे ही विचारणा पोलिसांनी केली असता, आपल्याला त्याचे नाव माहिती नाही. मात्र त्याचे दुकान कुठे आहे हे मी सांगू शकतो, असे तो दुकानदार म्हणाला. त्यानुसार पोलीस त्याच्यासोबत गेले असता काँग्रेसचा उत्तरभारतीय सेलचा जिल्हाध्यक्ष राजविर यादव याचा भाऊ अमर यादव याचे एसबीआय बँकेच्या समोर टॅटूचे दुकान आहे ते दुकान त्याने दाखवले. यानंतर पोलिसांनी यावर पाळत ठेऊन 23 मे ला रात्री 2 वाजता या दोन्ही आरोपींना बाबूपेठ येथील त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता आपणचा संतोषसिंग रावत यांच्यावर गोळीबार केल्याचे त्यांनी कबूल केले. रावत यांनी नोकरीचे अमिश देऊन सहा लाख घेतले होते आणि ते परत करत नव्हते म्हणून त्यांना संपवून टाकण्याचा कट रचल्याचे त्यांनी सांगितले.

कार, तरुणी आणि नंबर प्लेट : राजविर याने रावत यांना मारण्याचा जो कट रचला त्यात वापर करण्यात आलेली कार एका तरुणीच्या नावाने असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिच्या मित्राने आपल्याला काही कामासाठी तुझी कार हवी म्हणून मागितली होती. ही कार मिळाल्यावर या तरुणाने आपल्या मैत्रिणीला न कळवता ही कार राजविर याच्याकडे सोपवली आणि मग त्या कारची नंबर प्लेट काढून त्यात बनावट नंबर प्लेट लावण्यात आली.

मास्टरमाइंड वेगळाच : विजय वडेट्टीवार : विजय वडेट्टीवार यांनी या हल्ल्यातील मास्टरमाइंड वेगळाच असल्याचा दावा केला आहे. सहा सात वर्षांपूर्वी संतोषसिंग रावत यांनी आरोपींकडून पैसे घेतले होते अशी कबुली आरोपींनी दिली आहे. मात्र हे धादांत खोटे आहे, असा कुठलाही व्यवहार झाला नाही. या हल्ल्याचे मूळ कारण हे राजकीय आहे. त्याचा मास्टरमाइंड वेगळाच आहे. म्हणून पोलिसांनी या आरोपींची नार्को टेस्ट करावी म्हणजे या हल्लेखोरांचा करवता धनी कोण आहे, हे समोर येईल अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!