एक दिवा गरिबांच्या दारी.. गुरुदेव सेवा मंडळ चंद्रपूर यांच्या वतीने ‘आमची दिवाळी वंचितासोबत’ हा एक अभिनव उपक्रम…

591

श्याम म्हाशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक)

चंद्रपुर: राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की,
खरा उत्सव रोजचे कर्म, विचारे सांभाळावा धर्म
परी नैमित्तिक सणांचेही वर्म जाणोनिया आचरावे।।

भारतीय संस्कृतीतील महत्वाचा सण म्हणजे दिवाळी. अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा सण, परंतु हा सण समाजातील प्रत्येक व्यक्ती साजरा करतोच अस नाही. म्हणून महापुरुषांच्या विचाराने पावन झालेली या भारतभूमी मध्ये जगतांना संत आणि महापुरुष यांच्या विचार डोळ्यासमोर ठेवून दिनांक २४/१०/२०२२ रोज सोमवार पासून गुरुदेव सेवा मंडळ चंद्रपूर यांच्या वतीने ‘आमची दिवाळी वंचितासोबत एक अभिनव उपक्रम’ सुरू केलेली छोटीशी संकल्पना.

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीता ग्रंथामध्ये लिहितात दिवाळीचा सण आला! सर्वांनीच पाहिजे केला! परी पहावा कोण राहिला! भुकेला घरी! या सर्वांच्या परिचित असलेली ग्रामगीतेतील ओवी आपल्याला सामाजिक भान व दायित्व निदर्शनास आणून देते. या ओवीचे घराघरात पारायण सुरू आहेत, आणि ते असावे परंतु ही ओवी प्रत्यक्ष कृतीत आणणे ही काळाची गरज आहे समोर महाराज लिहितात की, त्यास आमंत्रित करावे! गोडधोड भोजन द्यावे !!परस्परांशी मिळून चालवावे! वैभव सर्वांचे !!या ओवीला आज कृतीत आणण्याची गरज भासत आहे त्यामुळे हाच संकल्प पूर्ण करण्याचा निश्चय काही चंद्रपूर येथील होतकरू तरुणांनी केला.

गेल्या दोन दिवसांपासून श्री गुरुदेव सेवा मंडळाची कार्यकर्ते श्री राज रामरावजी घुमनर श्री अनिल श्रीकृष्ण जी खामनकर, श्री विकास जी वैद्य, श्री सागर भोंगळे, तृप्तेष् माशीरकर अशा अनेक तरुण युवकांनी हे कार्य हाती घेऊन ,वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांचा संदेश अमलात आणण्याचा छोटासा प्रयत्न केला. आपण ज्याप्रमाणे दिवाळी आपल्या कुटुंबासहित आनंदात साजरी करतो त्या प्रकारे सर्वांना हा सण साजरा करण्याचा अधिकार आहे.

केवळ आर्थिक स्थिती चांगली नाही, पैशाच्या अभावी जर कुणाच्या घरी अंधार राहत असेल तर आपण हा उत्सव कसा साजरा करायचा?महाराज म्हणतात तुझा जीव प्रिय जैसा तसा इतरास नाही का? खरं तर हा प्रश्न आपल्या देशातील सर्व युवक अनेक पुढारी मंत्री संत्री मंडळी ना पडायला पाहिजे परंतु आपण सर्व आपल्याच मौजेत असतो आपल्या मेहनतीने कमावलेला पैसा नुसता फटाके फोडण्यात वाया घालवण्यापेक्षा आपण फटाके मुक्त दिवाळी साजरी करू शकतो. वेडी आशा कसली दिवाळी करते, आज दिवाळी रात्रीच होळी, उद्या उपाशी मरशील या प्रमाणे विचार करून या उपक्रमाची दखल घेऊन समाज भान जपणाऱ्या काही सहयोग दात्यांनी आपापल्या परीने आम्हाला सहयोग केला त्या प्रत्येकाचे इथे नाव घेण शक्य नाही पण त्यांच्या दानशूर पणाला सलाम.

आमची दिवाळी वंचितांसोबत या अभिनव उपक्रमांतर्गत लक्ष्मीपूजन च्या दिवशी हा सण साजरा करण्यापासून वंचित असलेले विविध राज्यातून जसे की छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश येथून कामाकरिता आलेले चंद्रपूर येथील दाताला रोड येथे पाल बांधून वास्तव्यास असलेले फडे,झाडू बनवण्याऱ्या बंधू-भगिनींसोबत त्यांना शाल, ब्लॅंकेट, साड्या ,फराळ आणि जीवनावश्यक वस्तू चे वाटप तीस ते पस्तीस कुटुंबांना संपूर्ण गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले.

दुसऱ्या दिवशी वरोरा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वृद्धाश्रम येथील सोनू ताई येवले यांच्या वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील आजीबाईंसाठी साखर तेल, किराणा व जीवनावश्यक वस्तू चे किट बनवून व फळाचे साहित्य वाटप करण्यात आले.तेथील वृद्धांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून भरून पावलो. वरोरा ते चंद्रपूर रोड वरील दिवाळीनिमित्त साहित्य विक्री करण्याकरिता बाहेर गावावरून आलेले ताडली जवळील मूर्ती कलाकार आणि मध्यप्रदेश छत्तीसगड राजस्थान व इतर राज्यातून आलेल्या बंधू-भगिनींना फराळ व जीवनावश्यक वस्तूंच्या किट चे वाटप करून त्यांच्या लहान मुलांसोबत व त्यांच्या परिवारासोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद आम्हाला मिळाला त्यासोबत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला अधिक कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा होता.

आम्हा तरुणांना हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करणारे डॉक्टर गेडाम सर यांनी 5000 रुपयाची निधी उपलब्ध करून सुरू केलेल्या या कार्याला अधिक वेग आला..या उपक्रमात सहकार्य करून उप्रकमाच्या सुरुवातीपासून ते पूर्णत्वास नेण्यापर्यंत आणि विशेष म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अतिशय मोलाचे सहकार्य केलेल्या सर्व मंडळींचे विविध संघटनेचे खूप खूप आभार धन्यवाद मंडळाने मानले आहे.