आरोग्य सेवेत कर्तव्यदक्ष काम करणारे गणेश मडावी यांची इंडिया दस्तक न्यूज टीव्हीचे जिल्हा संपादक श्याम म्हशाखेत्री यांनी घेतलेली मुलाखत…

886

|| आरोग्यसेवेतील दिवस ||
कोरोना – समज, गैरसमज आणि अफवांचा पुर

मी जुलै २०१६ ला जेव्हा शासकीय सेवेत रुजू झालो त्यावेळेस माझी प्रथम नियुक्ती ही आरोग्य विभाग मध्येच देण्यात आली. ते माझ्यासाठी अनोळखी गाव होतं आणि ते गाव होतं चंद्रपुर जिल्हयातील सिंदेवाही या तालुक्यातील “वासेरा” गाव, त्या गावात स्थित प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सध्या त्याचे नामांतर आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्र असे करण्यात आले आहे. अशा ठिकाणी कर्तव्य बजावण्याची संधी मिळाली आणि या संधीत खरच खुप काही शिकायला मिळालं. ग्रामीण भागातील आरोग्य विषयक समस्या किती विदारक असतात हे जवळून बघता आलं. कित्येकांचा हा गैरसमज आहे की ग्रामीण भागातील लोक हे फार सुखी असतात आणि त्यांना कसल्यास अडचनी उदभवत नाही. पण ही सत्यता नाही. आजही ग्रामीण भागात असा वर्ग राहतो की त्यांना साधं दोन वेळेच्या अन्नाकरिता पायपीट करावी. इतकच काय तर प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणी शुल्क ही 2 रुपये होती पण काही वृद्ध व्यक्तींकडे 2 रुपये देखील नसायचे. पण त्यांना कधी त्या 2 रुपयाकरिता आरोग्य सुविधेपासून वंचित ठेवले नाही. याकरीता इतर आरोग्य कर्मचारी पण सहकार्य करायचे. मुळात आपण प्रत्येक गोष्ट नियमाने करतो म्हणालो तरी पण आपल्यात जे हळव मन दडलं असते ते कधी कधी भावनिक विचार करायला लावत असते आणि प्रश्न राहिला नोंदणी शुल्काचा तर तो स्वतःकडून देखील जमा केलायं आणि त्यात एक वेगळंच आत्मिय समाधान लाभायचं. मुळात आपल्या माध्यमातून आरोग्य सेवेचं काम होतंय हीच भावना मनाला गर्व वाटायला पुरेशी होती. कित्येक जखमी रुग्णांना मलमपट्टी करणे आणि त्यांची जखम पूर्णपणे बरी झाली की त्यांचे आभाराचे शब्द आणि त्यांच्याकडून दिला जाणारा मान हा बहुमूल्य असा होता. खर तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आपल्या कामाचा योग्य असा मान ठेवला जातो आणि शहरी भागात प्रत्येक गोष्ट पैशामध्ये तोलण्यात येते पण प्रत्येक काम करणारा कर्मचारी हा पैशाचा भुकेला नसतो तर काही आपल्या कामाच्या, सेवेच्या जोरावर नाव मिळवणारे देखील आहेत.

अशातच आरोग्य सेवेत दैनंदिन कार्यात आणि वेळेवर येणाऱ्या राष्ट्रीय कामात गुंतून असताना कोरोनाचे सावट आले. आणि क्षणार्धात सगळं काही ठप्प झालं. आपली माणसे आपल्यापासून दूर झालीत. ताप, सर्दी,खोकला ही लक्षणे असणारी व्यक्ती देखील वैद्यकीय उपचार घेण्यास आरोग्य केंद्रात येण्यास कानाडोळा करू लागलीत आणि मेडिकल मधून स्वतःच औषध, गोळ्या घेऊन घरीच राहू लागलीत. यात कित्येक मजूर ही बाहेरगावी काम करण्याकरीता गेली होती. आणि सगळं काही बंद करण्यात येत असल्याची चाहूल लागताच गावाकडे परत येण्याकरिता धडपड करू लागली. त्यावेळेस वाहतूक सेवा देखील बंद करण्यात आली. त्यामुळे मृत्यूच्या भीतीने काहींनी पायदळ येऊन आपलं गाव गाठलं तर काहींनी मिळेल ते साधन आणि ते पण चढ्या दराने गाडी भाडे देऊन गावाची वाट धरली. पण इतकं करून देखील त्यांची अवस्था ही गावात आल्यानंतर अधिकच कठीण झाली. कारण तर गावातील नागरिक त्यांना गावात प्रवेश करण्यास मज्जाव करायची आणि यातच कित्येकदा आरोग्य कर्मचारी, गावकरी आणि परत आलेले मजूर यामध्ये वाद उफाळून आलीत. त्यात कुणाचा काही दोष नाही कारण तर प्रत्येकाला आपला जीव हा प्रिय आहेच.

भारत नाही तर प्रत्येक देशात हीच अवस्था होती आणि सगळे यावर प्रतिबंधात्मक लस केव्हा येणार? याकडे लक्ष लावून बसले होते. यावर भारताला यश आले आणि भारतीय बनावटीची लस उपलब्ध झाली. पण भारतात या लसीला स्वीकारणे कठीणच होते. मुख्यतः ग्रामीण भागात, जेवढी या लस बाबत शासनाने जागरूकता केली नसेल त्याहून दुप्पट लोकांमध्ये अफवांचा बाजार पसरलेला होता. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि इतर कर्मचारी यांना लस देण्यात आली. त्याकरिता सर्व कर्मचारी यांनी लस घेण्यास प्राधान्य दिले पण जेव्हा सामान्य व्यक्तिकरिता लस उपलब्ध झाली तेव्हा लस घेण्यास उदासीनता दिसून आली. कधी कधी तर एका दिवशी एका कूप्पीतील 10 डोज देखील संपत नव्हती. पण हळू हळू आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेवीका आणि जागरूक नागरिक, यांच्या प्रयत्नांनी लसीकरण चा वेग वाढण्यास सुरवात झाली. आणि दिवसाचे 100 डोज पेक्षा जास्त डोज होऊ लागली आणि एका सत्रात तर जिल्ह्यातून डोज देण्यात, मी कार्यरत असलेले आरोग्य केंद्र हे दुसऱ्या स्थानावर होते. आणि याकरिता वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेवीका यांचा मोलाचा वाटा होता.
——–
नाव – श्री. गणेश विनायक मडावी
पदनाम – कनिष्ठ सहाय्यक
कार्यालय – आरोग्य विभाग, जि.प.चंद्रपुर
मोबाईल क्र. – 8149785529