बळीराम काळे/जिवती
जिवती : प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत गृह मंत्रालयाकडून मागणी केल्यानुसार केंद्र शासनाच्या ग्राम विकास विभाग, नवी दिली रस्ते जोडणी व रस्ते सुधारण्यासाठी जिवती तालुक्यातील अनेक नवीन रस्त्यांचे काम विविध कॅट्रक्शन च्या माध्यमातून सुरू आहे. त्यापैकी टेकामंडवा ते माराईपाटण या रस्त्याचे काम गुप्ता कॅट्रक्शन नागपूर हे करीत आहेत. ते काम खुप कासव गतीने सुरू आहे,माराईपाटण येथील यात्रा होळी पासून सुरुवात होत असते, चंद्रपूर जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील भाविक गंगामाता देवस्थान माराईआई चे दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी वाहनांची भरपुर प्रमाणात आवक जावक रहदारी असते.परंतु टेकामंडवा -माराईपाटण रस्त्यावर पूर्णपणे गिट्टी विखुरलेली आहे, रस्त्यावर मोठं मोठे खडे पडलेले आहेत त्यामुळे दुचाकी वाहन धारकांना मार्ग काढण्याकरिता जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे.
टेकामंडवा ते माराईपाटण या रस्त्याच्या दुर्दशामुळे अनेक अपघात घडले आहेत. परंतु सुदैवाने जीवित हानी झाली नाही,पण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माराईपाटण येथील यात्रेला येणारे भक्त व परिसरातील नागरिक रस्त्याच्या दुर्दशामुळे वैतागले आहेत. त्वरित टेकामांडवा ते माराईपाटण रस्त्याचे काम सुरू केले नाही तर परिसरातील नागरिकानी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.