अनोळखी मृतदेहाला शीर नसल्याने पोलिसांसमोर होते मोठे आव्हान…चार दिवसात पोलिसांनी मृत युवतीची ओळख काढली…

523

भद्रावती येथे 22 वर्षीय युवतीचे नग्नावस्थेत असणारा शीर नसलेला मृतदेह मिळाल्याने एकंच खळबळ उडाली होती. मृतदेहाला शीर नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे झाले मात्र सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखेने 4 दिवसात सदर युवतीची ओळख पटवीत गुन्ह्यासंदर्भात माहिती मिळविली.

निर्गुण हत्या करून मयताची ओळख पटू नये म्हणून शीर कापून युवतीचा मृतदेह फेकून देऊन पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकण्याचा गुन्हेगारांनी केलेला प्रयत्न नियोजनबद्ध असल्याचे , तसेच गुन्हेगार सराईत असल्याचे असेही जाणवत होते . मात्र पोलिसांनी घटनेची माहिती कळताच चंद्रपूर पोलीस अधीक्षक रवींद्र साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेहा सह परिसराची पाहणी केली. हत्या करणाऱ्याने गुन्ह्याचे पुरावे, खुनाची निशाणी सोडली नसल्याने सदर मृत तरुणीची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर आव्हान होते .

घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हा शाखेतील सर्व अधिकारी व पथक तसेच सायबर सेल मधील सायबर एक्सपर्ट यांच्या मार्फतीने मृतदेह महिलेच्या शरीरावरील खुणा, मृतदेहाजवळ मिळालेल्या तिच्या वापराच्या वस्तू इत्यादी शोध पत्रिका तयार करून शोध घेण्यात आला. तसेच चंद्रपूर व आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांमधून मागील काही दिवसात ह्या वयाच्या हरवलेल्या, पळून गेलेल्या मुलींच्या माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू होता.
घटना घडून काही दिवस होऊनही कोणत्याही मुलीच्या हरवल्याची तक्रार प्राप्त झाली नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी तांत्रिक तपास केला .तसेच गोपनीय माहिती मिळवण्याचा अहोरात्र प्रयत्न केला. त्यामध्ये पोलिसांना यश आले.

गोपनीय माहिती दाराकडून सदर महिलेची ओळख पटविण्यात आली. व तिचा मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आला. त्यावरून तिच्या राहते घरचा रामटेक (जिल्हा नागपूर) येथील पत्ता प्राप्त झाला. त्यावरून तिची मोठी बहीण यांच्याशी संपर्क साधून ओळख पटविण्याची खात्री करण्यात आली. तिच्या बहिणीने तिच्या शरीरावरील व्रन व वापरातील वस्तू पाहून हा मृतदेह तिची बहीण असल्याची खात्री केली. स्वतंत्र राहत असल्याने ती बेपत्ता असल्याचे अथवा तिच्यासोबत कुठलाही अप्रिय घटना घडली असल्याचा कुटुंबीयांना संशय आला नसल्याने पोलिसांना कुठलीही तक्रार देण्यात आली नाही असे कुटुंबीयांनी सांगितले .