लाखांदूर : गडचिरोलीवरून साकोलीकडे जात असलेल्या भरधाव कारचा टायर फुटला. यामुळे कार मार्गालगत असलेल्या झाडावर आदळून अपघात झाला. यात एका वृद्धेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन चिमुकल्यांसह पाच जण गंभीर जखमी झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना लाखांदूर-साकोली मार्गावरील दांडेगाव फाट्याजवळ रविवारी (ता. २०) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. शालिनी श्यामराव चिंचेकर (वय ७०, रा. गडचिरोली) असे मृत महिलेचे नाव आहे.
तर, वाहन चालक-मालक अभिषेक नंदकिशोर चिंचेकर (वय २७), कल्पना नंदकिशोर चिंचेकर (वय ४४), प्रियंका रमणकुमार काटनकर (वय २९), हित रमणकुमार काटनकर (वय चार वर्षे), सोनायना रमणकुमार काटनकर (वय दीड वर्षे) अशी जखमींचे नाव आहेत. जखमींना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे.
गडचिरोली येथील रहिवासी अभिषेक नंदकिशोर चिंचेकर हे कारने आपल्या नातेवाइकांसोबत साकोलीकडे जात होते. दरम्यान, दांडेगाव फाट्याजवळ अचानक गाडीचा टायर फुटला.
यात कारला अपघात होऊन शालिनी चिंचेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दिघोरी/मोठी पोलिसांना अपघाताची माहिती होताच ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळी पंचनामा करून जखमींना ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पाचही जखमींना ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात हलविले आहे. मृत वृद्धा वाहन चालकाची आजी असल्याचे सांगण्यात आले. तपास ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.






