कसं काय सुचते गं तुला हे सगळं लिहायला? मला सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न! बऱ्याचदा तर मी इतकी गोंधळून जातेय की मलाच प्रश्न पडतो नेमके काय उत्तर द्यावे या प्रश्नाचे?
पण, प्रश्न उपस्थित झालाय तर मग उत्तर देणे भागच!
बऱ्याचदा मी इतकेच बोलते की ‘बस सुचतय मला तशी तशी लिहित जाते मी’
पण खर सांगू तर ‘कवितेचा जन्म’ हा इतरांप्रमाणेच माझ्यासाठी सुद्धा फार कुतूहलाचा विषय आहे! ‘कवितेचा जन्म’ हा विषय ‘भाषेचा जन्म’, ‘पृथ्वीचा जन्म’, किंवा ‘मानवाचा जन्म’ या विषयांइतकाच संशोधनीय, कुतूहलाचा,तर्क शक्ती पणाला लावण्याजोगा आहे! त्यात भाषेचा जन्म आणि कवितेचा जन्म हे विषय एकमेकांशी साम्य साधणारे आहेत. कारण, आज जगभरात जवळपास ७,१०० भाषा बोलल्या जातात. आपण फक्त भारताचाच विचार केला तर सद्यस्थितीत भारतात १२१ भाषा आणि २७० मातृभाषा अस्तित्वात आहेत. आणि सद्यस्थितीत जगात, भारतात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक भाषेत लिखाण करणारे कविवर्य देखील आहेत. आपण इतिहासात अभ्यासले की इतिहासकारांनी इतिहासाचे वर्गीकरण दोन भागात केले होते. प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ. ज्या काळात इतिहास संशोधनाकरीता आवश्यक असलेले लिखित पुरावे आढळत नाहीत त्याला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात आणि ज्या काळात इतिहास संशोधनाकरीता आवश्यक असलेले लिखित पुरावे आढळतात त्याला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. जेव्हा मानवाला कळले की मौखिक ज्ञान पुढल्या पिढीपर्यंत माहिती पोहचविण्याकरीता पर्याप्त नाही किंवा ते लुप्त होण्याची किंवा त्यामध्ये फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे तेव्हापासून मानवाने त्याला अवगत असलेले ज्ञान लिहिण्यास सुरूवात केली असावी. या लिखाणाच्या वारस्यातूनच पुढे कधीतरी साहित्याचा जन्म झाला असावा. कदाचित एखाद्या संवेदनशील व्यक्तीच्या मनात अगोदर पण विचारांची गर्दी व्हायची पण लेखनकला अवगत नसल्यामुळे त्याचे विचार फक्त त्याच्या पुरतेच आणि कदाचित त्याच्या काही प्रियजनांपुरतेच मर्यादित राहिले.
मग का एखादी भाषा लिहिता-बोलता आली म्हणजे जो तो साहित्यिक,कवी होऊ शकतो काय? अर्थातच नाही!
मानवाला लेखनकला अवगत झाल्यावर ती अचानकच सर्वसामान्य झाली असे नाही. बऱ्याच काळ ती विशिष्ट वर्गापर्यंतच सिमित होती. विद्यार्जन करणारे विद्यापती, राज्याचा लेखाजोखा सांभाळणारे कारकून इत्यादी मंडळी लेखनकलेत पारंगत होती. विशेषतः विद्यार्जनाने लक्षणीय तर्क शक्ती,स्वतंत्र वैचारिक बुद्धी आणि विश्वाकडे अधिक निकोप दृष्टीने बघण्याची दिव्यदृष्टी लाभलेले विद्वान, मनाने काहीसे संवेदनशील… जगाच्या पाठीवर यांनीच सर्वात पहिल्यांदा कवितेला जन्म दिला असणार असे माझे प्रांजळ मत आहे.
बरं, वेदना आणि संवेदना या दोघींचा कवितेच्या जन्मात सिंहाचा वाटा असतो! कवीमन संवेदनशील असते यात दुमत नाहीच पण बऱ्याचदा काही वेदना कठोर हृदयावर देखील इतक्या खोल जखमा देऊन जातात की त्या वेदनांवर वेळीच
सहानुभूतीचा किंवा प्रेमाचा औषधोपचार झाला नाही तर ती वेदना शेवटी कवितेच्या रूपात जन्म घेत असते. असेच काहीसे विधान लेखिका कान्झा जावेद आपल्या ‘ॲशेस,वाईन ॲंड डस्ट’ या पुस्तकात करतात “पीपल रिकव्हर डिफरंटली. सम चेंज सिटीज, सम फॉल इन लव्ह ॲंड सम बिगीन रायटिंग.”
‘दगान’ या सुप्रसिद्ध कवितासंग्रहाचे लेखक, कवी किशोर कवठे कवितेची अगदी मोजक्या शब्दांत व्याख्या करताना म्हणतात, ‘कविता म्हणजे जिंदगीचा सातबारा.. ‘. हृदयातल्या हळव्या कोपऱ्यात साचलेला भावनांचा, स्मृतींचा, वेदनांचा संचय, त्याला लाभलेली एकांताची जोड, आणि तशी तर ठराविक अशी वेळ नसतेच पण काळ्या क्षितिजावर चंद्र-चांदणे अधिराज्य गाजवित असतांना,अख्खे विश्व गाढ झोपी गेले असतांना… अश्या काहीश्या मध्यरात्रीच्या सुलभ वातावरणात एक कोरा कागद आणि पेनासहित हा खोलीच्या एका कोपऱ्यात काहीतरी लिहिताना दिसेल. बरं, प्रत्येक कवी,लेखक त्याला आलेले अनुभव किंवा त्याच्या आवडीनुसार काही विशिष्ट विषयावर कविता करण्यात पारंगत असतात. व्यक्तीश: मला प्रेम, जातिभेद आणि स्त्रीदास्य या विषयांवर कविता करायला फारच आवडतात.
कविता म्हणजे कविचे अपत्य असे माझे व्यैक्तीक मत आहे. मानवी प्रजातीचे किंवा एखाद्या कुळाचे, घराण्याचे अस्तित्व टिकून रहावे याकरीता माणूस प्रजननामार्फत अपत्य जन्माला घालतो. तसेच काहीसे कवितेच्या बाबतीत घडते, हळव्या हृदयातल्या संवेदनांमार्फत कवी कविता जन्माला घालतो हीच कविता कवीचे पृथ्वीतलावरील शारीरिक अस्तित्व संपल्यावर देखील कधी पुस्तकांत, कधी लोक म्हणींमार्फत सदैव समाजात कवीचे अस्तित्व टिकवून ठेवते.
येथे मला माझी एक हिंदी भाषेतील चारोळी आठवली,
‘हद से ज्यादा प्यारी लगती हैं मुझको ये मेरी कविताएं,कल जब मैं ना रहूॅंगी इस दुनिया में फिर भी जिंदा रहेगी मेरी कविताएं!’.
आपण मानवी संस्कृतीची कवितांबगैर कल्पना करूच शकत
नाही. सगळा शब्दांचा खेळ असतो…! पण किती आश्चर्याची बाब आहे की यमक जुडणाऱ्या काही शब्दांचा समूह (ज्याला लोक कविता म्हणतात! ) माणसांना रडवितो, हसवितो…
किती अंर्तमनातून भावना ओतून कवीने त्या कागदावर उतरविल्या असणार! बऱ्याचदा कवितेतील भावभावनांशी माणूस स्वतः च्या भावनांचा संबंध जोडतो. शेवटी एकच की ज्या गोष्टी सूर्याला ही दिसत नाहीत त्या गोष्टी सहज बघू शकणारा कवी आणि त्याच्या लेखणीतून समाजाचा उद्धार करण्याकरीता जन्मलेल्या कविता नेहमीच समाजजीवनाचा अद्वितीय घटक असणार. कारण, जोपर्यंत मानवी हृदयात संवेदना जिवित आहेत तोपर्यंत कवितेचा जन्म होणे भागच आहे.
-निकिता शालिकराम बोंदरे. नागपूर
ईमेल – nikitabondre1234@gmail.com






