HomeBreaking Newsदोन दुचाकी समोरासमोर धडकले; तीन जण ठार

दोन दुचाकी समोरासमोर धडकले; तीन जण ठार

कोरची : कोरची मुख्यालयापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या पकनाभट्टी येथे गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास देवरी (जि.गाेंदिया) कडून येत असलेली दुचाकी आणि समोरून येणारी दुसरी दुचाकी यांच्यात जबर धडक झाली.

यात दोन्ही दुचाकी वाहने रस्त्याच्या कडेला फेकल्या जाऊन तिघांना प्राण गमवावे लागले. या अपघातात दाेघे जण गंभीर जखमी आहेत.

प्राप्त माहितीनुसार, देवरी येथून बेळगावकडे जात असलेल्या दुचाकीवरून (एमएच २५, झेड ४३६७) तिघे जण प्रवास करत होते. त्यांच्या दुचाकीची समोरून येत असलेल्या दुचाकीला (सीजी ०४, एलआर ३२९५) जबर धडक बसली. त्यामुळे दोन्ही वाहनांवरील पाच लोक रस्त्याच्या कडेला पडले. या अपघातात पाचही लोकांच्या पायांचे हाड मोडले.
या अपघातग्रस्तांपैकी पुरुषोत्तम अलोने (३०) रा. कोहळीटोला ता. देवरी, अशोक बकाराम नाईक (४५) रा. अंबोरा जि.गाेंदिया आणि कांतीलाल घुघवा (१८) रा. दोडके ता. काेरची या तिघांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. तर तुळशीराम कवास, रा. रेंगेपार जि. गाेंदिया आणि प्यारेलाल घुघवा रा.दोडके हे गंभीर जखमी आहेत. सर्वांना जखमी अवस्थेत काेरची ग्रामीण रूग्णालयात आणून प्राथमिक उपचार केल्यानंतर गडचिरोली येथे रुग्णवाहिकेने हलविण्यात आले. पण पुढील उपचार मिळण्यापूर्वीच दाेघांचा मृत्यू झाला.
सदर अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णवाहिका पाठविण्यासाठी १०८ क्रमांकावर संपर्क केला; परंतु रुग्णवाहिका गडचिरोली आणि चंद्रपूरला गेली असल्याचे सांगण्यात आल्याने त्यांनी स्वतःची गाडी घेऊन घटनास्थळ गाठले व जखमींना कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यास मदत केली.
दरम्यान, नगरसेवक गुड्डू अग्रवाल यांनीसुद्धा आपल्या वाहनाने रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.
घटनास्थळी तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन रुग्णांच्या नातेवाइकांना अपघाताची माहिती दिली.

चारपैकी तीन डॉक्टर गैरहजर
सदर रुग्णांना कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतरही रुग्णांना बराच वेळ बाहेर तडफडत राहावे लागले. या रुग्णालयात ४ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. मात्र, त्यापैकी ३ वैद्यकीय अधिकारी नेहमीप्रमाणे गैरहजर दिसून आले. होळीचा सण असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. असे असताना सदर रुग्णालय एका डॉक्टरच्या भरवशावर सुरू असल्याने रुग्णांना योग्य उपचार मिळण्यास विलंब होत आहे. ५ गंभीर रुग्णांवर एकच डॉक्टर उपचार करीत असल्याचे चित्र गुरूवारी दिसत होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!