ओमिक्रॉन’ची उपराजधानीत दस्तक

0
228

नागपूर : ओमिक्रॉन विषाणूने उपराजधानीत दस्तक दिली आहे. दिघोरी परिसरातील ४० वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटची बाधा झाल्याचा अहवाल जनुकीय चाचणीतून प्राप्त झाला आहे. यामुळे नागपुरातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. मात्र, या युवकाची प्रकृती ठणठणीत आहेत. दहाव्या दिवशी आणखी एकदा चाचणी करण्यात येईल.

राज्यात कल्याण डोंबिवलीत पहिला कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळून आला. यानंतर मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले. नागपुरातही चिंता वाढवणारी मोठी बातमी आली आहे. नागपुरात देखील पश्चिम आफ्रिकेतून परतलेल्या व महापालिकेच्या नेहरूनगर झोन मधील रहिवासी असलेल्या ४० वर्षीय पुरुषाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ओमिक्रॉन नागपुरातील हा पहिला रुग्ण आहे. त्या बाधिताची प्रकृती स्थिर असून, एम्समध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणात उपचार सुरू आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप ओसरला आहे. मात्र, आफ्रिकेत ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने नव्याने चिंता वाढवली आहे. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तसेच जोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करण्यासोबतच तो कोरोनाबाधित आढळल्यास त्यांचा नमुने जनुकीय चाचणीसाठी (जिनोम सिक्वेंसिंग) पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात येतात.

नागपुरातून आतापर्यंत १९ जणांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोखमीच्या देशातून आलेल्यांपैकी दोन मायलेकींसह एक पुरुष व इतर एक कोरोनाबाधित आढळून आला होता. त्या सर्वांचे नमुने हे पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेत. त्यातील एकाचा अहवाल ओमिक्रॉन बाधित आढळला उर्वरित नमुने प्रतीक्षेत आहेत. मध्यभारतातील हा पहिला ओमिक्रॉन बाधित आहे.

५ डिसेंबरला नागपुरात एम्समध्ये दाखल

पश्चिम आफ्रिकेतून ५ डिसेंबरला नागपूर विमानतळावर परतलेल्या ४० वर्षीय व्यक्ती ओमिक्रॉनबाधित आढळला. पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो या शहरातून नागपुरात विमानतळावर पोहोचला. विमानतळावर कोरोना तपासणी केली. त्यात कोरोनाबाधित असल्याचे आढळले. यामुळे घरी जाऊ न देता, महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित पुढील उपचारासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले. आफ्रिकेतील प्रवासाची पार्श्वभूमी असल्याने रुग्णाला स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. सिक्वेंसिंगसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. रविवारी १२ डिसेंबरला ओमिक्रॉन बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. ‘ओमिक्रॉन’ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, रुग्णाला कोणतेही लक्षणे दिसून आली नाही.

महापालिकेमार्फत मेयो रुग्णालयातून चार नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले. एका नमुन्याचा अहवाल ओमिक्रॉन बाधित असल्याचे आढळले. उर्वरित इतर नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत. ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती ठणठणीत असून नव्या दहाव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल. या चाचणीत निगेटिव्ह आल्यानंतर सुटी देण्यात येईल.

राम जोशी, उपायुक्त, महापालिका, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here