अनुकंपा तत्वावरील जागा भरण्यासाठी प्रक्रिया गतिमान करा..पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश.

0
98

चंद्रपूर  : जिल्ह्यात शासकीय नोक-यांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅकलॉग आहे. नोक-या उपलब्ध असून उमेदवारांची प्रतिक्षा यादीसुध्दा मोठी आहे. अनुकंपा तत्वावरील नोकरीची वाट पाहता पाहता काही पात्र लोकांचे आयुष्यसुध्दा निघून जाते. मात्र त्याला नोकरी मिळत नाही. त्यामुळे अनुकंपा तत्वावरील जागा भरण्यासाठी स्थानिक स्तरावर सर्व विभागांनी गतिमान प्रक्रिया करावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या जागेबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा उपायुक्त विपीन पालिवाल, पालिका प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, पोलिस उपअधिक्षक शेखर देशमुख, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिक्षक प्रिती डूडूलकर, कोषागार अधिकारी प्रिती खरपुरे, वन विभागाचे एन.एन. बोरीकर आदी उपस्थित होते.

रिक्त पदांच्या 20 टक्केच जागा एका वर्षी भरण्याची तरदूत असली तरी ही प्रक्रिया गतिमान होणे आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, प्रतिक्षा यादीत असलेल्या उर्वरीत उमेदवारांना कंत्राटी पध्दतीने नियुक्ती देण्याचे नियोजन करावे. तसेच ज्यावर्षी पदे रिक्त झाली, त्याच वर्षी ती त्वरीत भरली जावी. अनुकंपा तत्वावरील रिक्त पदे भरण्यासाठी स्थानिक स्तरावर जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षेतेखाली निर्णय घेता येतात. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी अनुकंपाबाबत प्रत्येक विभागाचा स्वतंत्र आढावा घ्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here