नागपुरात एसटी कर्मचाऱ्याचा झाडावर चढून केला आत्महत्येचा प्रयत्न

0
239

नागपूर (Nagpur ) : २७ ऑक्टोबर रोजी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी उपोषण आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांना थोडासा का होईना, पण दिलासा मिळाला, असे वाटत असताना आज नागपुरात एसटी चालक झाडावर चढला आणि तेथून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इतर कर्मचाऱ्यांनी वेळेवर धाव घेऊन त्याला वाचवले आणि अनर्थ टळला.

एसटीतील कमलेश ठाकरे हा चालक महामंडळाच्या धोरणांमुळे वैतागला होता, असे सांगण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एसटी डेपोमध्ये चालक दिलीप हरिभाऊ काकडे (वय ५६, रा. आव्हाने, ता. शेवगाव) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ताजी असताना नागपुरातही तशीच घटना घडणार होती. त्यामुळे सरकारने आता तरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या गंभीरपणे घेऊन त्या पूर्ण कराव्या, अशी मागणी जोर धरत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांना घेऊन आंदोलन सुरू होते. यामुळे प्रवाशांची चांगलीच अडचण निर्माण होती. काही मागण्या मान्य केल्याने एसटीचा संप मागे घेण्यात आला. असे असले तरी नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. कमलेश यांनी झाडावर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बाब इतर कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आली.

त्यांनी झाडाकडे धाव घेत कर्मचारी ठाकरेला खाली उतरवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागण्या मान्य झाल्या असल्या तरी एसटी कर्मचारी आर्थिक संकटात असल्याने ठाकरे यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here