दिनेश मंडपे नागपूर शहर प्रतिनिधी
नागपूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नागपुरात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये आंबेडकर यांच्या पत्नी म्हणजेच माई तसेच त्यांचे लाखो अनुयायी हजर होते. त्या दिवशीच आंबेडकर यांनी नेमकं काय केलं ? बौद्ध धम्म स्वीकारण्याचा विधी नेमका कसा पार पडला ? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यावर ओझरता प्रकाश….
*नागपूर शहराच्या मधोमध सोहळा पार पाडला*
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या उत्थानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. हिंदू धर्मातील असमानता तसेच चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवत त्यांनी अस्पृश्यांना योग्य वागणूक दिली जावी यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर अखेरीस सामाजिक चळवळीत काम करताना तब्बल 21 वर्षानंतर त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. नागपूर शहराच्या मधोमध असलेल्या दीक्षाभूमीच्या परिसरात हा सोहळा पार पाडला. यावेळी आंबेडकर यांच्यासोबत तब्बल तीन लाख आंबेडकर अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारला.
*आंबेडकर 11 ऑक्टोबरलाच नागपुरात आले होते*
बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी ठरलेल्या कार्यक्रमानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर 11 ऑक्टोबरलाच नागपुरात दाखल झाले होते. नागपुरातील श्याम हॉटेलमध्ये ते थांबलेले होते. या कार्यक्रमाची वार्ता महाराष्ट्रभर पसरल्यामुळे रोज हजारो आंबेडकर अनुयायी नागपुरात येत होते. प्रत्यक्ष 14 ऑक्टोबरला दीक्षाभूमी परिसरत लाखो लोक जमले होते. त्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पांढरा कोट, पांढरा सदरा तसेच पांढरे धोतर परिधान केले होते. 14 ऑक्टोबरला पाढरे शुभ्र वस्त्र परिधान करुन ते दीक्षाभूमीच्या प्रांगणात आले होते.
*त्यांनी बुद्धाला वंदन करुन पुष्पहार अर्पण केले*
दीक्षाभूमीवर व्यासपीठावर माई आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर उभे राहताच टाळ्यांचा कडकडाट झाला होता. भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांनी कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात केली. व्यासपीठावर बुद्धाची आणि बाजूला वाघाच्या दोन मूर्त्या होत्या. यावेळी या समारंभाची सुरुवात एका मराठी गीताने झाली. आंबेडकर तसेच माई यांनी ‘बुद्धं शरणं गच्छामि’, ‘धम्मं शरणं गच्छामि’, ‘संघं शरणं गच्छामि’ हे त्रिशरण म्हटलं. तसेच त्यांनी जिवांची हत्या, खोटं बोलणे, अनाचार, मद्यपान यापासून दूर राहणार असल्याचे पंचशीलही उद्धृत केले. त्यानंतर बुद्धाला वंदन करुन पुष्पहार अर्पण केले. हा सर्व विधी पार पडल्यानंतर आंबेडकर यांनी अधिकृतरित्या बौद्ध धम्माची दीक्षा घेतली असं सांगण्यात आलं.
*तब्बल तीन लाख अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली*
या सोहळ्यात त्यांनी मी हिंदू देवदेवतेचा भक्त राहीलेलो नाही. तसेच माझा अवतार या संकल्पनेवर विश्वास राहिलेला नाही, असे सांगितले. या धम्मदीक्षा समारंभात आंबेडकर यांच्यासोबत तब्बल तीन लाख अनुयायांनी बौद्ध धर्म्म स्वीकारला होता.






