HomeBreaking Newsसन 2021-22 मध्ये जिल्ह्यासाठी 300 कोटींच्या खर्चाला मंजूरी - पालकमंत्री वडेट्टीवार...सर्व ग्रामीण...

सन 2021-22 मध्ये जिल्ह्यासाठी 300 कोटींच्या खर्चाला मंजूरी – पालकमंत्री वडेट्टीवार…सर्व ग्रामीण रुग्णालयात फायर फायटिंग सिस्टीम बसविणार…जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे नुतणीकरण करण्याच्या सुचना

चंद्रपूर, दि. 14 ऑगस्ट : गत दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असली जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याला आपले प्राधान्य आहे. सद्यस्थितीत एकूण मंजूर तरतुदीच्या 60 टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र वेळेपर्यंत जिल्ह्याला 100 टक्के निधी देण्यात येईल, असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. तसेच सन 2021-22 मध्ये जिल्ह्यासाठी 300 कोटी निधीच्या खर्चाला मंजूरी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

नियोजन सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा संध्या गुरनुले, खासदार बाळू धानोरकर, आमदार सर्वश्री ना.गो. गाणार, सुभाष धोटे, प्रतिभा धोटे, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपायुक्त (नियोजन) श्री. थुटे, जिल्हा नियोजन अधिकारी ग.रु. वायाळ, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर आदी उपस्थित होते.

कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, भंडारा सारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणून सर्व ग्रामीण रुग्णालयात फायर फायटिंग सिस्टीम त्वरीत लावणे गरजेचे आहे. त्यासाठी 7 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नुतणीकरण करून ज्या ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे, तेथे त्वरीत बांधकाम करावे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. प्रत्येक तालुक्यात अद्ययावत वाचनालयाची गरज आहे. जिल्हा ग्रंथपालांनी सर्व प्रस्ताव एकत्रित मंजूर करून निधी मागणी करावी.

जिल्ह्यात निर्लेखित केलेल्या 35 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींना विकासासाठी 25 लक्ष रुपयांचा निधी देण्याचे नियोजन आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा ग्रामपंचायतींचे प्रस्ताव ताबडतोब घ्यावे. दोन नद्यांच्या संगमावर वसलेले वढा धार्मिक स्थळाला पर्यटनाअंतर्गत ‘ब’ दर्जा देऊन विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना पूर्ण करा. इतर मागास वर्गासाठी स्वतंत्र घरकुल योजना प्रस्तावित आहे. तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आता व्हीजेएनटीच्या मुलांनासुध्दा प्रवेश देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाकाळात काही खाजगी डॉक्टरांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसा उकळला. अशा डॉक्टरांची चौकशी झाली पाहिजे. तसेच रुग्णांकडून अतिरिक्त घेण्यात आलेले पैसे संबंधितांना मिळाले पाहिजे, याबाबत संबंधित विभागाने गांभिर्याने कार्यवाही करावी, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी सादरीकरण करतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले की, सन 2020 – 21 मध्ये सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्याला 248.60 कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. तो 100 टक्के खर्च करण्यात आला आहे. तसेच आदिवासी उपयोजनेअंतर्गत प्राप्त झालेला 83.93 कोटींचा निधीसुध्दा पूर्ण खर्च करण्यात आला आहे.

सन 2021 – 22 साठी जिल्ह्याचा एकूण मंजूर नियतव्यय 300 कोटींचा असून यापैकी 30 टक्के निधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर खर्च करायचा आहे. तसेच एकूण मंजूर नियतव्ययाच्या 60 टक्के निधीच्या खर्चाला पहिल्या टप्प्यात मंजूरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यु झालेल्या सर्व नागरिकांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्वांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी श्री. वायाळ यांनी केले. बैठकीला विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. राष्ट्रगिताने बैठकीची सांगता झाली.

0000000

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!