नागपूरमधिल धक्कादायक घटना ! अल्पवयीन मुलीवर एकाच रात्रीत दोन वेळा सामूहिक बलात्कार…

1129

ब्युरोचिफ प्रशांत शाहा
नागपूर : नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एकाच रात्रीतून दोन वेळा सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. ही घटना 29 जुलैच्या रात्री घडली असून याबाबतची माहिती समोर येताच पोलीस विभागामध्ये खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी नागपुरातील सीताबर्डी पोलिसांनी बलात्कार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या ऑटो चालकासह चार आरोपींना अटक केलेली आहे. प्रकरणातील पीडिता ही 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी असून ती अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. घरामध्ये भांडण झाल्याने 29 जुलैच्या रात्री ती घराबाहेर पडली होती. त्यानंतर एका ऑटो चालकास तिने सीताबर्डी येथे सोडण्यास सांगितले.

पण त्याच ऑटो चालकाने तिला आपल्या अन्य सहकाऱ्यांसह शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर ऑटो चालकाने पीडित युवतीला रेल्वे स्टेशन परिसरामध्ये नेऊन सोडून दिले.
रेल्वे स्टेशन परिसरामध्ये गस्तीवर असणार्‍या रेल्वे पोलिसांना पीडित युवती दिसल्यावर तिने घडलेल्या घटनेची माहिती त्यांना दिली.

त्यानंतर रेल्वे पोलिसांनी नागपूर शहर सीताबर्डी पोलिसांच्या मदतीने ऑटो चालकासह चार आरोपीना या प्रकरणात अटक केली असून सीताबर्डी पोलीस पुढील कारवाई करीत आहे.