HomeBreaking Newsमहिलांची गगनभरारी: विदर्भात एका विभागीय आयुक्तासह, पाच महिला जिल्हाधिकारी...

महिलांची गगनभरारी: विदर्भात एका विभागीय आयुक्तासह, पाच महिला जिल्हाधिकारी…

नागपूर : समाजात वावरताना पूर्वी महिलांना दुय्यम स्थान दिले जायचे. समाजात वावरण्याची मक्तेदारी फक्त पुरुषांकडेच होती. महिलांना तो अधिकार नव्हता. मात्र, जसजसा काळ बदलत गेला तसतशी महिलांसाठी वेळ बदलत गेली आणि त्यांना समाजात मानाचे स्थान मिळू लागले. आता ‘चूल आणि मूल’ सांभाळण्यापुरतीच महिला राहिलेली नाही. ती आज गगनभरारी घेत असल्याचे दिसून येत आहे. याची प्रचिती मंगळवारी रात्री उशिरा पुन्हा आली.

राज्य सरकारने मंगळवारी २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात विदर्भातील सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या बदल्यांमध्ये पवनीत कौर आणि निमा अरोरा यांच्या क्रमशः अमरावती आणि अकोल्याच्या जिल्ह्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी आर. विमला (नागपूर), नयना गुंडे (गोंदिया) व प्रेरणा देशभ्रतार (वर्धा) या विदर्भाच्या जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार या यापूर्वीच काम पाहत आहेत. कौर आणि अरोरा याच्या नियुक्तीने विदर्भातील महिला जिल्हाधिकाऱ्यांची संख्या दोनने वाढून पाच झाली आहे. तसेच प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नागपूर विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अमरावती जिल्हा

अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची बदली मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवपदी करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागी पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पवणीत कौर या पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.

अकोला जिल्हा

अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र एस. पापळकर यांना अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले असून, विद्यमान मनपा आयुक्त श्रीमती निमा अरोरा यांना पापळकर यांच्या रिक्त जागी अकोल्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

गोंदिया जिल्हा

नागपूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांची गोंदियाच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली होती. त्यानंतर नयना गुंडे यांच्या नियुक्तीने गोंदियाला दुसऱ्या महिला जिल्हाधिकारी मिळाल्या आहेत. नयना गुंडे यांनी यापूर्वी वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नागपूर महानगरपालिकेतही अतिरिक्त महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

वर्धा जिल्हा

प्रेरणा देशभ्रतार यांची पाच महिन्यांपूर्वी वर्धाच्या जिल्ह्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या पूर्वी पुणे येथील समाज कल्याण येथे कार्यरत होत्या.

नागपूर जिल्हा

तीन ते चार दिवसांपूर्वी आर. विमला यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आर. विमला या महसूल संवर्गातून सनदी अधिकारी झाल्या आहेत. त्यांनी रवींद्र ठाकरे यांची जागा घेतली. पूर्वी त्या जलजीवन मिशनच्या संचालकपदी कार्यरत होत्या.

नागपूर विभागीय आयुक्त

मराठी भाषा विभागातून बदली झालेल्या आणि नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी रुजू झालेल्या प्राजक्ता लवंगारे-वर्मा विभागाची जबाबदारी सांभाळत आहे. पूर्व विदर्भातील आयएएस अधिकाऱ्यांसाठी त्या मार्गदर्शक तसेच नियंत्रकाच्या भूमिकेत कार्यरत आहेत.

पूर्व विदर्भ महिलांचाच

विदर्भाचा पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडतात. पश्चिम विदर्भात यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशीम या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. तर पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यांचा समावेश होते. यातील पन्नास टक्के जागांवर महिलांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यात नागपूर, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!