Homeचंद्रपूर"चोऱ्या करणाऱ्या लोकांनाच पहारेकरी म्हणून नियुक्त करणारे छत्रपती शाहू महाराज..."

“चोऱ्या करणाऱ्या लोकांनाच पहारेकरी म्हणून नियुक्त करणारे छत्रपती शाहू महाराज…”

“चोऱ्या करणाऱ्या लोकांनाच पहारेकरी म्हणून नियुक्त करण्याचा जगातील एकमेव प्रयोग करणारे छत्रपती शाहू महाराज…”
-सुरज पि. दहागावकर.

फासेपारधी हि समाजातील तळाशी समजली जाणारी भटकी जमात, फासे टाकून शिकार करणे हा त्यांचा धंदा. प्राणी-पक्षी फासे टाकून पकडणे ह्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. पण ही साधने अपुरी पडत असल्यामुळे त्यांना अवैध काम करणे साहजिकच भाग पडायचे. कारण पोटाची भूक मिटविण्यासाठी कुणाला काय करावे लागेल ह्याची काही कल्पना करता येत नाही.

महाराज एकदा कटकोळास मुक्कामास होते. तेव्हा त्यांच्या कानावर एक बातमी आली की काही फासेपारधी लोक चोऱ्या करून लोकांना त्रास देत आहेत आणि कॅम्पवर सुद्धा ते चोऱ्या करण्यासाठी येणार आहेत म्हणून महाराजांनी आपल्या काही सैनिकांना पाठवून चोऱ्या करणाऱ्या फासेपारधी लोकांना पकडून आणले आणि त्यांची तुरुंगात रवानगी केली. पण महाराज दूरदृष्टीचे होते, त्यांना माहित होते की कोणताही माणूस दुसऱ्याच्या वाट्याला सहजासहजी जात नाही. त्यामुळे त्यांना फासेपारधी लोक अवैध धंद्याकडे का वळले हे जाणून घ्यायचे होते. त्यामुळे काही दिवसानंतर काही फासेपारधी लोकांना बोलावून विचारले की,

*महाराज:-* काय रे, चोऱ्या करता का तुम्ही ? लयी हौस आहे वाटते तुरुंगाची हवा खायची?
*फासेपारधी:-* तुरुंगात जाण्याची हौस नाही महाराज…
*महाराज:-* मग ह्या चोऱ्या कशाला करता रे?
*फासेपारधी:-* “पोटासाठी आणि जगण्यासाठी” महाराज..
*महाराज:-* असे वाईट काम करण्यापेक्षा धंदा वगैरे का करत नाही
*फासेपारधी:-* महाराज, आम्हाला फक्त फासे टाकून पक्ष्यांना,प्राण्यांना पकडता येते त्याच्या पलिकडे काही पण येत नाही..
*महाराज:-* हो तर मग चोऱ्या करायच्या का रे..?
*फासेपारधी:-* काय करणार महाराज दुसरं काही करता येत नाही आणि लोक जवळ करत नाही मग पोटात भुकेचा जो आकांत सुटलो त्याला शांत करण्यासाठी आम्हाला असे काम नाईलाजाने करावे लागते, महाराज!

महाराजांना फासेपारध्यांचे दुःख कळून आले. फासेपारध्यांचे शब्द ऐकून महाराज सुद्धा गहिवरले. आता त्यांनी विचार केला की ह्या लोकांना माणसात आणलं पाहिजे म्हणून सर्वाना सोनतळीला पाठविले. ज्या लोकांना समाजाने झिडकारले त्या फासेपारधी लोकांना प्रेमाने आणि सन्मानाने माणसात आणणारे एकमेव व्यक्ती म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय. सोनतळीला सर्व फासेपारधी आले पण त्यांना काम कोणते द्यावे, चुकीच्या रस्त्याने जाणारी गाडी चांगल्या रुळावर कशी आणायची यावर महाराजांनी विचार सुरू केला. त्यांना एक जबरदस्त कल्पना सुचली. महाराजांनी आपल्या कॅम्पवर फासेपारधी लोकांना पहारेकरी म्हणून नियुक्त केले. चोऱ्या करणाऱ्या लोकांनाच पहारेकरी म्हणून नियुक्त करण्याचा हा जगातील एकमेवच प्रयोग असेल.

काही लोकांना नोकरीवर घेतले म्हणून सर्व फासेपारधी लोकांच्या कुटुंबीयांचे प्रश्न सुटणार नाही हे महाराजांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्वाना रोजगार मिळाला ह्या हेतूने त्यांनी गरज नसतांनाही कच्या बांधकामासाठी हुकूम काढला आणि यातून फासेपारधी लोकांना रोजगार मिळवून दिला. गौतम बुद्धांनी शिकवलं आहे की, प्रेमाने जग जिंकता येते. तसंच जर प्रेमाच्या ताकदीवर जंगली प्राणी त्या माणसाजवळ येऊ शकतात तर त्याच प्रेमाच्या भरवश्यावर जंगली माणसांना सुद्धा समाजातील माणसात आणता आले पाहिजे असा दृढविश्वास महाराजांनी दाखविला.

ज्या फासेपारधी लोकांना पहारेकरी म्हणून नियुक्त केले त्यांनी जर स्वतःच्या जुन्या सवयीनुसार चोऱ्या करतील तर आपल्या कॅम्पचे खूप नुकसान होणार ह्याची कल्पना महाराजांना आली. त्यामुळे महाराजांनी फासेपारधी लोक पहारेकरी म्हणून चोख काम करतात की नाही म्हणून एका रात्री पहारेकऱ्यांच्या जवळपास थोडा आवाज केला, अन् तेवढ्यात भिरभिर करत गोफनातून सुटलेले दोन दगड आवाज केलेल्या ठिकाणी येऊन धडकले. नशीब चांगले की आवाज करणारे दोन सेवक एका आडोश्याला लपून बसले होते नाहीतर त्यांचा जीव गेलाच असता. अशी काही महाराजांची तळमळतेने सेवा फासेपारधी लोकांनी केली.

मनात स्वार्थी हेतू ठेऊन लोकांना त्रास देणारे, चुगल्या करून स्वतःचा मतलब साध्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा महाराजांना राग येत होता. त्यावर महाराज म्हणतात की, मला त्या अधिकाऱ्याचा राग येतो जे नाक फुगवून माझ्या समोर गंभीर स्वरूपात उभे राहतात. तेव्हा असे वाटते की त्याच्या घरी दुःखाचे डोंगर कोसळले आहेत आणि आता त्यांच्या सर्व कुटुंबियांची जबाबदारी माझ्यावर येऊन ठेपली आहे. मला असे वाटू लागले आहे की तश्या अधिकाऱ्यांचे तोंड बघण्यापेक्षा मला माझ्या फासेपारधी लोकांच्या सहवासात राहायला आवडते. कारण फासेपारधी लोकांसोबत जरी मी दिवसभर बसलो तरी मला कंटाळा येत नाही, आणि भूक लागली तरी मला कळत सुद्धा नाही.

शुद्ध कपडे घालून अशुद्ध विचार करणाऱ्या लोकांपेक्षा मळलेल्या कपड्यातील ते लोक चांगले आहेत ज्यांचे मन एकदम शुद्ध आहे. कारण ती अडाणी जरी असली तरी आपल्या कामात तरबेज आणि हुशार असतात. पहारेकरी आपल्या जवळच्या माणसाला घाबरून बळी पडतात की काय म्हणून महाराजांनी एक दिवस बापुसाहेबमहराज यांना सोनतळीला बोलाविले आणि इकडे सर्व पहारेकऱ्यांना सांगुन ठेवले की माझ्या आदेश आल्याशिवाय कुणालाही आत सोडायचे नाही. बापूसाहेब महाराज एका तासात सोनतळीला पोहचल्यावर त्यांना फासेपारधी पहारेकऱ्यानी अडविले. बापूसाहेब त्या पहारेकरी लोकांना प्रेमाने समजून सांगितले की, मी तुमच्या महाराजांचा भाऊ आहे आणि त्यांनी मला तातळीने बोलाविले आहे पण फासेपारधी आपल्या शब्दांवर ठाम होते. महाराजांचा आदेश आल्याशिवाय तूम्हाला आता सोडणार नाही. एवढ्यात बापूसाहेब महाराज पाहरेकऱ्यावर रागावले तेव्हा फासेपारधी म्हणतो की, “हे घ्या बंदूक अन् आमच्यावर गोळ्या झाडून आतमध्ये तूम्ही जाऊ शकता, तुम्ही त्याचे भाऊ आहे म्हणून सांगतो. तेवढ्यात शाहू महाराज घटनास्थळी येतात आणि बापूसाहेब यांना घेऊन आतमध्ये जातात. अशी काही निस्वार्थी मनाने सेवा केलेली ज्वलंत उदाहरण होती. यावरून असे दिसते की, हि फासेपारधी जमात इमानदार आणि प्रामाणिक होती. सेवा देतांना जीव जाईल पण आपल्या सेवेप्रति ते कधी बैमान झाले नाही…त्यामुळेच जंगली लोकांना माणसात आणण्याचा आगळावेगळा उपक्रम महाराजांनी राबविला..

फासेपारधी लोकांना रोजगार मिळाला म्हणून महाराजांनी रस्त्याचे काम सुरु केले…पण त्यांच्या लक्षात आले की, हे रस्त्याचे काम संपल्यावर काय करतील हे लोकं म्हणून मग त्यांनी स्वतःच्या बंगल्याजवळ विहीर खुदाई सुरु केली. काळ्या दगडावर विहीर खोदणे हा अजब प्रयोग समजावा लागेल. पण शाहू महाराजांचा विहीर खोदण्याच्या हेतू नव्हताच तर त्या फासेपारधी लोकांना रोजगार मिळायला पाहिजे म्हणून विहीर खोदण्याचे काम सुरु केली. महाराजांच्या आदेशाप्रमाणे फासेपारधी लोकांनी खुदाई करण्याचे काम सुरु केले पण एकशे दहा फूट खोल विहीर खोदून सुद्धा पाण्याचा एक थेंबही लागला नाही पण लोकांना रोजगार मिळाला हे मात्र नक्की…

शाहू महाराज आपल्या कॅम्पमध्ये घराचे कच्चे बांधकाम करीत त्यामुळे पाऊस आला की ही घरे जमीनदोस्त व्हायची. हा प्रकार दरवेळी व्हायचा त्यामुळे महाराजांच्या ह्या आदेशावर इतर लोकांनी नाराजी व्यक्त केली आणि लोक महाराजांना म्हणायचे की, आपण एकदाचे पक्के आणि शोभनिय घरे का बांधून देत नाही. त्यावर महाराजांनी खुप सुंदर उत्तर दिले, “मी मजबूत असे घराचे बांधकाम करून देऊन समाधान मानू की, आज कामावर असणाऱ्या हजारो कामगारांच्या आशीर्वादातून मिळणाऱ्या आनंदात समाधान मानू..? तुम्हीच सांगा की, “हि माणसे सुखाने दोन घास खाल्यावर आनंद येईल की मजबूत घर बांधल्याने? माझे हे सर्व काम कमी पैश्यात पूर्ण होते त्यामुळे सतत ह्या लोकांना काम देणे मला परवडते आणि मिळणाऱ्या त्या रोजगारातून हि माणसे सन्मानाने स्वतःचा उदरनिर्वाह करत असतात.

इतिहासात ज्या लोकांचा कधी शिक्षणासोबत संबंध आला नाही त्यात एक म्हणजे फासेपारधी जमात होती पण या फासेपारधी लोकांच्या पोरांना शिकविण्याची सोय महाराजांनी करून दिली. जे मुलं शाळेत जातील त्यांच्यासाठी दोन भाकरी देण्याची व्यवस्था महाराजांनी करून दिली. तसेच काही पोरांना गुरुकुलात राहण्याची आणि शिक्षणाची सोय करून दिली. महाराज खरंच परीस होते..

*महाराजांनी फासेपारधी लोकांना जवळ केले*
*अन् फासेपारध्यांच्या जीवनाचे सोने झाले*

दिवसेंदिवस फासेपारधी लोकांकडे बघण्याचा सामान्य लोकांचा दृष्टीकोन बदलत जात होता. गुन्हेगार असलेली ही जमात आता लोकांमध्ये मिसळून काम करू लागली. सामान्य लोक हि त्यांना जवळ करायला घाबरत नव्हती. शाहु महाराज यांना फासेपारध्यांना लोकांत आणायचे होते, ते त्यांनी करून दाखविले. बांधकाम संपल्यानंतर त्यांनी राधानगरी धरणाचे काम काढले..या धरणाच्या बांधकामासाठी फासेपारध्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. फासेपारधी ज्यावेळी पहारेकरी म्हणून नियुक्त करण्यात आले तेव्हा लाल्या आणि आरवा हे त्यांचे प्रमुख होते. पण नंतर महाराजांनी त्यांच्या कार्यावर खुश होऊन पोलीस खात्यात घेऊन त्यांना जमादार केले.

एकदा विजापूर मध्ये चोऱ्या-डकेत्या मोठ्या प्रमाणात सुरु होत्या..तेथील पोलिसांना आरोपी काही सापडत नव्हते. जिल्हा पोलीस प्रशासन हतबल आणि निराश झाले असतांना त्यांनी हि बातमी करवीर संस्थानाकडे पाठवून मदत मागितली. त्यामुळे हि मोहीम फत्ते करण्यासाठी महाराजांनी लाल्या जमादारास पाठवले. महाराजांच्या छत्रछायेखाली तयार झालेला लाल्या ने विजापूरला जाऊन तेथील चोरांचा बंदोबस्त केला. यावर खुश होऊन जिल्हा पोलीस प्रमुखाने एक प्रमाणपत्र आणि रोख १५ रु. बक्षीस म्हणून दिले. महाराजांनी सर्वप्रथम फासेपारध्यांना पहारेकरी म्हणून नेमले. नंतर त्यांना कामे दिली. त्यानंतर त्यांना निरोप देणारे निरोपे म्हणून नियुक्त केले. हळहळू एक एक करत काही लोकांना आपल्या जवळ ठेऊन घेतले.

फासेपारधी सामान्य लोकामध्ये एकरूप झाले तरी कपडे घाण असलेले लावायचे. कारण तेवढी हि सुधारणा अजून पर्यत झालेली नव्हती. तरी सुद्धा महाराज काही फासेपारध्यांना आपल्या गाडीत बसवित असायचे. एक दिवस महाराजांनी फासेपारध्यांना गाडीत बसविले सोबत कवी हैदर बसला होता. फासेपारध्यांना बघून हैदर ने नाक मुरडले आणि महाराजांना म्हटले की, महाराज आपण किती हि या लोकांसाठी केले तरी हे लोक काय सुधारणार नाही आणि या लोकांच्या अंगाची वास येतच राहणार..मग अशा लोकांना आपण का जवळ करता? ह्यावर महाराज म्हणतात की, “अरे तू असू दे, तुला तर कपड्यात घाण दिसते पण आपल्या शरीरातच घाण आहे आणि हे संपूर्ण शरीर किड्यांनी बनले आहे” वरील उत्तरातून समजून येते की, फासेपारध्यांवर महाराज किती जीवापाड प्रेम करत होते. त्या फासेपारध्यांना मायेच्या सावलीत वाढविले..

फासे टाकून पशु-पक्षी जाळ्यात लटकविण्यात हे फासेपारधी माहिर होते. त्यामुळे फासेपारध्यांच्या या गुणांचा महाराजांना पुरेपुर फायदा करून घेतला. शिकार खात्यात काही फासेपारध्यांना नोकरी दिली. त्यामागील हेतू हाच की, हे लोक जनसामान्य लोकांत येऊन आपले व्यवहार करायला शिकले पाहिजे. शिकार करण्यासाठी फासेपारधी कोल्हापूर संस्थानाच्या बाहेर गेले की त्यांच्याकडे लोक गुन्हेगार जमात म्हणून बघत होते. त्यामुळे इतरांकडून त्रास होऊ नये. म्हणून खास दिवाणाकडून त्यांना एक दाखला दिला जात होता त्यामुळे त्या फासेपारध्यांना कुणी पकडत नसायचे. शाहू महाराजांच्या संस्थानाचा दाखला बघून त्यांना कुणी अडवत नव्हते. तसेच महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळे ते जनमाणसात येऊ लागले. राहणीमान हळूहळू बदलत गेली, कपडे स्वच्छ घालायला सुरुवात केली. कुणाशी कसे बोलावे-राहावे याची समज फासेपारध्याना येऊ लागली.

प्रवास माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे दुरुदृष्टी असलेल्या शाहू महाराजांनी फासेपारध्यांना विंध्य पर्वताच्या पलीकडे पाठविण्याचे ठरविले पण एवढ्या दूरच्या प्रवासाला पाठविण्यासाठी काहीतरी निमित्य हवे होते. त्यांना कारण सापडले त्यांनी एक फर्मान काढून जे पक्षी-प्राणी आपल्या संग्रहालयात नाही अश्या ना पकडून आणण्याची जबाबदारी फासेपारध्यांवर सोपवुन त्यांना इंदोर च्या जंगलात पाठविले. सोबत एक पत्र फासेपारध्यांकडे देऊन त्यामध्ये फासेपारध्यांना आपण पकडू नये तर त्यांना मदत करावी अशी विनंती इंदोर च्या वनखात्याकडे केली. चोऱ्या करणे सोडून ठेऊन त्यांनी सुखाने संसार करावा..आपले पूर्वीचे दिवस विसरून जाऊन नव्या जोमाने आयुष्य जगावे. नोकरी करून जीवन समृद्ध करावे. वर्षानुवर्षे चालत आलेला जंगलीपणा दूर सारून ते सुसंस्कृत बनावे म्हणून महाराज आयुष्यभर फासेपारधी लोकांच्या कल्याणासाठी झटले.

सर्वप्रथम फासेपारधी लोकांचा आर्थिक प्रश्न सोडवला. कारण फासे टाकून प्राणी पकडण्या पलिकडे दुसरा पर्याय फासेपारध्याकडे नव्हता त्यामुळे ते अवैध काम करायचे. पण आता हाताला काम मिळाल्यामुळे त्यांचा आर्थिक प्रश्न सुटला. फासेपारधी लोक सामान्य माणसाच्या वस्तीत राहावे म्हणून त्यांना राहण्यासाठी जमिनी दान केल्या..आता ते फासेपारधी लोक लोकांमध्ये राहायला लागले. समाजाच्या नजरेत गुन्हेगार जमात म्हणून ओळख असलेल्या,जंगलात राहणाऱ्या मानव जातीला, आपल्या समाजाच्या चौकटीत आणले अन् नुसते आणलेच नाही तर त्यांना आईची माया देऊन जीवनमान असे उंचविले जाऊ शकते ह्यावर महाराजांनी अंमल केला. कुणी विचारही करू शकणार नाही असे परिवर्तन महाराजांनी आपल्या राजकीर्दीत करून दाखवले. अश्या सामाजिक परिवर्तनाच्या जादुगरास मानाचा सलाम…

(संदर्भ:-राजश्री शाहू गौरव ग्रंथ)

सुरज पी. दहागावकर.
चंद्रपूर
मो.न.8698615848

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!