सावधान! चंद्रपुरात वाघाची दहशत: एकाच दिवशी तिघांचा मृत्यू…

893

चंद्रपूर : विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने दहशत निर्माण केली असून बुधवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघाच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. शिवाय एक वनरक्षक देखील वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला आहे.

पहिल्या घटनेत सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव जवळील पेंढरी येथील दिवाण तलाव परिसरात बुधवार १९ मे ला सकाळच्या सुमारास कोकेवाडा, पेंढरी येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेला वाघाने ठार केले. मृतक महिला ही तेंदूपत्ता संकलनाकरीता गेली होती. मात्र त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने सीताबाई गुलाब चौके या महिलेवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही व नवरगाव येथील पोलीस व वनविभागाचा चमू घटनास्थळी दाखल झाला.

दुसऱ्या घटनेत सावली तालुक्यातील निफांद्रा येथे वाघाच्या हल्ल्यात रामा आडकू मारबते या ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर गेवराच्या जंगलात वाघाचा मागोवा घेत असताना अचानक वाघाने हल्ला केला असता वनरक्षक संदीप चौधरी जखमी झाले आहेत. तिसऱ्या घटनेत तेंदूची पाने गोळा करण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय रजनी भालेराव या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. चिपराला बिट ऑर्डनन्स फॅक्टरी भागात आज सकाळी रजनी भालेराव तेंदूची पाने गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र दबा धरून बसलेल्या वाघाने रजनी यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.