Home Breaking News डॉक्‍टर….आम्हाला आमच्या पेशंटला भेटू दे नाहीतर? #जम्बो रुग्णालयातील डॉक्‍टरांना नातेवाईकाची चिठ्ठीद्वारे धमकी

डॉक्‍टर….आम्हाला आमच्या पेशंटला भेटू दे नाहीतर? #जम्बो रुग्णालयातील डॉक्‍टरांना नातेवाईकाची चिठ्ठीद्वारे धमकी

557

पुणे – जम्बो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणि आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णाला भेटू दे, अशी मागणी नातेवाईकांनी केली. रुग्णालय प्रशासनाने त्याला नकार दिल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्‍टरांना चिठ्ठीद्वारे धमकीच दिली. ‘डॉक्‍टर….आम्हांला आमच्या पेशंटला भेटू दे. नुसते मोबाइलवर बोलून जमणार नाही. आम्हांला रोज एकदातरी ‘आयसीयू’मध्ये जाऊ दे. नाहीतर बघ तू..तुझी गाडी नंबर….’ असे या चिठ्ठीत लिहिले आहे.

करोनाची बाधा झाल्यानंतर त्या बाधिताच्या जवळ जाण्यालाही कोणी तयार होत नाही. अगदी जवळचा नातलग करोनाने गेला तरी त्याच्या अंत्यसंस्कारालाही कोणी येत नाही.

त्या कुटुंबाशीही काही दिवस लोक ‘आयसोलेट’ राहतात. असे असताना जम्बोमध्ये उपचार घेत असलेल्या नातेवाईकाला रोज भेटू द्या, अशी मागणी एका नातेवाईकांनी केली. एवढेच नव्हे भेटू नाही दिले तर संबंधित डॉक्‍टरांना बरे वाईट करण्याची थेट धमकीच चिठ्ठीद्वारे दिली.

तेथील डॉक्‍टरांनी वरिष्ठांना आणि महापालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांना ही चिठ्ठी मोबाइलद्वारे पाठवून दिली. अशी मानसिकता जर बाधितांच्या नातेवाईकांची राहिली तर डॉक्‍टरांना उपचार करणे अवघड जाते. त्यातून असे नातेवाईक प्रक्षुब्ध (पॅनिक) झाले तर विपरित प्रकार घडतो, डॉक्‍टरांना मारहाणही होते. त्यामुळे जेथे नातेवाईकांना जाण्याला प्रतिबंध आहे तेथे जाण्यासाठी बळजबरी करू नये. यामुळे डॉक्‍टरांचेही खच्चीकरण होते, असे मत वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.

 

Don`t copy text!