प्रशांत शहा (विदर्भ ब्युरो चीफ)
तालुक्यातील मुकुटबन येथे सायंकाळी ५ वाजल्यानंतर सुद्धा लॉकडाऊनच्या काळात थंडावलेला अवैध दारू विक्री व्यवसाय आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला असून अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. दारू विक्रीवर बीटजमादार व मुकुटबन पोलिसांचा आशिर्वाद असल्याची चर्चा गावात रंगत आहे.
मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मुकुटबन या गावात एका विशिष्ट चौकात बसून दारू ८० ते १०० रुपयाला विकली जाते तसेच इतर ठिकाणी विदेशी दारू मिळत असल्याची चर्चा आहे. जिह्लाअधिकारी यांच्या नियमाला डावलून ५ वाजल्यानंतर सुद्धा अवैध देशी तसेच विदेशी दारू विक्री सुरू असल्याची माहिती आहे.
या दारु विक्री व पोहोचविणाऱ्या तस्करांचेही पोलिसांबरोबर चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच दारू दुकान बंद झाल्यानंतर इतर ठिकाणी साठा करून ठेवलेली दारू मुकुटबनातून इतर गावमध्ये कशी जाते ? जात असलेली त्यांची वाहने पोलीसांकडून अडविली का जात नाहीत ? पोलीस विभागाचे कर्मचारी वेळोवेळी अवैध दारु विक्रेत्यांकडून धाडी टाकून मुद्देमाल जप्त करतात.
परंतु जप्त केलेला विविध प्रकारचा विशिष्ट बॅच नंबरचा माल हा नेमका कोणत्या सरकारमान्य दुकानातून पुरवठा केला गेला ? याची साधी चौकशीही केली जात नाही. आरोपीवर एखादी लहान सहान कलम लावली जाते. त्यामुळे कितीही कारवाया केल्या तरी या दारू तस्करांचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही अशाच अविभार्वात दारु विक्रते वागताना दिसत आहेत. एखाद्या वेळी कारवाई झाली तरी पुन्हा नवीन जोमाने दारूची तस्करी करणे सुरू करतात.
जप्त केलेल्या मालाची सखोलपणे चौकशी करण्याची मागणी होत आहे. अवैध दारु विक्रीचा प्रकार मुकुटबन व आसपास परिसरात सर्रास सुरू असून वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाला सूचना देऊनही या प्रकाराकडे लक्ष दिले जात नसल्याने यावर वरदहस्त नेमका कुणाचा ? मुकुटबन पोलिसांचाच या अवैध दारू विक्री करणाऱ्यावर आशीर्वाद नाही ना ? अशी दबक्या आवाजात नागरिकांत चर्चा सुरू आहे.