मनात आत्महत्येचे विचार येत आहेत तर मग जरूर वाचावा हा लेख…”आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का?”

0
708

प्रेमात धोका मिळाला कर आत्महत्या, व्यवसायात नुकसान झाले कर आत्महत्या, नोकरीच टेन्शन आहे कर आत्महत्या, डिप्रेशन मध्ये आहे कर आत्महत्या, प्रसिद्धी मिळाली तरीही कर आत्महत्या….खरंच आयुष्य किती स्वस्त झालं आहे ना! जगण्यापेक्षा इथं तरुणांना मरण सोप्प वाटतं अन जवानीच्या वयात पोरग बापाच्या खांद्यावर दिसतं. किती दुर्दैवाची गोष्ट…. वर्तमानपत्र हातात घेतलं की, टीव्ही समोर बसलं की, आत्महत्याच्या बातम्या डोळ्यासमोर हमखास दिसतात. मग विचार येतो की खरंच माणसाचं आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का?

प्रवासाच्या वाटेवरून चालतांना कुठे खड्डे असतील, कुठे रस्ता कच्चा असेल, अचानक ब्रेकर समोर येईल, एखादे वाहन आपल्या दिशेने येईल तेव्हा न डगमगता गाडीवरचे संतुलन व्यवस्थित असले की, प्रवास सुखरूप होतो. परंतु खड्डे दिसले म्हणून मी समोर जाणार नाही असं कुणी म्हणतो का? हायवे ने जाताना अचानक कच्चा रस्ता लागला म्हणून कुणी परत येतो का? नाही ना! मग आयुष्याचं अगदी असच..कारण आयुष्यात अडचणी आल्याशिवाय आयुष्याची खरी किंमत माणसाला कळत नाही…

कुणीतरी खूप छान म्हटलं आहे की, जीवनात अडचणी येणे हे ‘Part of life‘ आहे आणि त्यातून हसत बाहेर पडणे ही ‘Art of life‘ आहे. जगण्याची कला माणसानं शिकावी. आयुष्यात अडचणी येत राहतील, क्षणोक्षणी आयुष्य तुमची परीक्षा घेत राहील म्हणून चिंता करायची नाही. त्यावर उपाय शोधावा कारण जगात अशी कोणतीच समस्या नाही की, ज्या समस्येवर उपाय नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे फक्त मार्ग शोधता आला पाहिजे.

जगात असा कोणताही प्राणी आढळणार नाही की, ज्याच्या वाट्याला दुःख नाही, चिंता नाही…प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, चिंता आहे. सुखासोबत प्रवास करतांना कधीतरी दुःखासोबतही प्रवास करावा लागतोच. म्हणून निराश होऊ नका. मिळालेले आयुष्य समाधानाने जगा. कारण एकदा मिळालेलं आयुष्य पुन्हा भेटत नाही.

पु.ल.देशपांडे म्हणतात ‘भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र जगातील माणसं दाखवतो…’ म्हणून जीवनात अशी माणसं जोडा की, जी तुमच्या सुखात नसली तरीही चालतील पण दुःखात मात्र तुमची कायम सावली म्हणून राहतील. कारण सुखाचे भागीदार खूप असतात पण दुःख मात्र अनाथ होत आणि अश्या या अनाथ असलेल्या दुःखाला दत्तक घेणारा कुणीतरी हवा असतो. म्हणुन जीवनात माणसं नक्की जोडत रहा… कारण कोण कुठे? कसा? केव्हा? आणि कधी कामात पडेल काही सांगता येत नाही…

शेवटी एकच सांगणं की, आयुष्य संपविण्यापूर्वी एकदा त्या माऊलीचा विचार करा, ज्या माऊलीने तुम्हाला नऊ महिने पोटात ठेवलेलं असतं.. त्या बापाचा विचार करा ज्यांनी स्वतःपेक्षा तुमच्या आयुष्याचा विचार जास्त केला असतो. त्या मित्र-परिवाराचा विचार करा ज्या मित्रांसोबत तुमचं रक्तपेक्षाही जवळच नातं बनलेलं असत आणि त्या समाजाचा विचार करा ज्या समाजापुढे भविष्यातील आयडियल तुम्ही असाल…म्हणून सोन्यासारखं आयुष्य कुणासाठी एका क्षणात संपवू नका. कारण आयुष्य इतकं स्वस्त नाही मित्रांनो आणि महत्वाचं आत्महत्या केल्याने आयुष्यातील प्रश्न संपत नाही तर प्रश्न निर्माण होतात कायम न सुटण्यासाठी….

-सुरज पि. दहागावकर.
रा-चेकबापूर तह-गोंडपिपरी जि-चंद्रपुर
मो.न.8698615848

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here