वैद्यकीय वर्तुळात खळबळ: चंद्रपुरातील मानवटकर हॉस्पिटलमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धाड…४००० झोपेच्या गोळ्या जप्त…

0
820

चंद्रपुर :–चंद्रपूर शहरातील एका नामवंत व मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर अन्न व औषध प्रशासनाने धाड घालत लाखो रुपयांचा विनापरवाना साठविलेला औषध साठा जप्त केल्याने वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कोरोना काळात जीवनावश्यक औषधांचा साठा नियंत्रित रहावा यासाठी चंद्रपूरच्या अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने विविध रुग्णालयांची अचानक तपासणी केली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार होत असलेल्या या तपासणी दरम्यान शहरातील एकोरी वार्डात असलेल्या डॉ. प्रकाश मानवटकर यांच्या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये अन्न औषध प्रशासनाचे पथक पोहोचले. दरम्यान या रुग्णालयाची तपासणी केली जात असताना संगणकातील नोंदी आणि प्रत्यक्ष साठा यात तफावत आढळून आल्याने पथकाने रुग्णालयाची कसून तपासणी केल्यावर रुग्णालयाच्या तळघरात साठवून ठेवलेला हा औषधसाठा आढळून आला.

या विनापरवाना अवैधरित्या साठवून ठेवलेल्या औषधात ४००० अल्ट्राझोलम या झोपेच्या गोळ्यांचा समावेश होता. दरम्यान विटामिन गोळ्यांसह अन्य मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या औषधींचा साठा आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने मानवटकर हॉस्पिटलच्या विरोधात मोठ्या कारवाईला प्रारंभ केला आहे.

विनापरवाना औषध साठा साठविणे- तो साठा आदर्श स्थितीत नसणे यासह अन्न व औषध प्रशासनाची संबंधित विविध कलमान्वये ही कारवाई केली. दरम्यान कोरोना काळात अन्य कोणत्याही औषध आस्थापनांने अशा पद्धतीने बेकायदेशीर साठा साठवू नये असे आवाहन देखील प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ही कारवाई एफडीआय सहाय्यक आयुक्त सी. के. डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here