स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार एका महिलेला फाशी…

2342

प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या कुटुंबातील 7 जणांची निर्घृण हत्या करणाऱ्या शबनम नामक महिलेला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तिला उत्तरप्रदेशातील मथुरा येथील कारागृहात फाशी दिली जाणार आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला फाशी दिली जाणार आहे.

उत्तरप्रदेशातील अमरोहामधील हसनपूरजवळ असणाऱ्या बावनखेडी गावात राहणाऱ्या शबनमने प्रियकर सलीमच्या मदतीने 2008 साली 14 आणि 15 एप्रिलच्या मध्यरात्री आपल्या घरातील 7 जणांची हत्या केली. यामध्ये शबनमचे वडील मास्टर शौकत, आई हाश्मी, भाऊ अनीस आणि रशीद, वहिनी अंजूम आणि तिची बहीण रबीया या 6 जणांना समावेश होता. त्यानंतर शबनमने आपल्या लहान भाच्याची देखील गळा आवळून हत्या केली होती.

सलीमसोबत असणाऱ्या आपल्या प्रेमाला कुटुंबाचा विरोध असल्याने शबनमने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. अमरोह येथील न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी 2 वर्ष 3 महिने चालली. त्यानंतर 15 जुलै 2010 रोजी जिल्हा न्यायालयातील न्यामूर्ती एस. ए. ए. हुसैनी यांनी शबनम आणि सलीमला फाशीची शिक्षा सुनावली. शबनम आणि सलीम प्रकरणासंदर्भात तब्बल शंभर दिवस न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यादरम्यान न्यायालयाने 29 साक्षीदार तपासलेत. सुनावणीदरम्यान एकूण साक्षीदारांना 649 प्रश्न विचारले. त्यानंतर याप्रकरणी न्यायालयाने 160 पानांचा निकाल दिला होता.

याप्रकरणी राष्ट्रपतींनी शबनमचा दयोचा अर्ज स्वीकारलेला नाही. तसेच शबनमच्या फाशीची तारीखही निश्चित झालेली नाही. परंतु, मथुरा कारागृह प्रशासनाने तिच्या फाशीची तयारी सुरू केलीय. निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देणाऱ्या मेरठच्या पवन जल्लादनेही या तुरुंगामधील फाशीघराची दोन वेळ पहाणी केली आहे. त्यांनी फाशी देण्यात येणाऱ्या ठिकाणी असणारा खटका आणि काही गोष्टींमध्ये दोष असल्याचे निरिक्षण नोंदवल्यानंतर त्यासंदर्भातील डागडुजी केली जात आहे. तसेच बिहारमधील बक्सरमधून शबनमला फाशी देण्यासाठी वापरण्यात येणारी दोरी मागवण्यात येणार असल्याची माहिती मथुरा कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिली.