HomeBreaking Newsब्रेकिंग न्यूज! चुनाळा ग्रामपंचायत निवडणूक जिंकलेल्या सातही महिलांनी नाकारले सरपंच पद.....

ब्रेकिंग न्यूज! चुनाळा ग्रामपंचायत निवडणूक जिंकलेल्या सातही महिलांनी नाकारले सरपंच पद…..

चंद्रपूर : चंद्रपूरमधील चुनाळा ग्रामपंचायतीत विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक जिंकलेल्या सातही महिलांनी सरपंच पद नाकारल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. चुनाळा ग्रामपंचायतीत सरपंच पदाची जागा ही महिलांसाठी राखीव आहे. सरपंच पदासाठी असलेले महिलांचे आरक्षण बदलण्याची मागणी तहसिलदारांकडे केली आहे. ग्रामपंचायत सदस्य बाळनाथ वडस्कर यांच्यासाठी ७ महिलांनी सरपंच पद नाकारले आहे. वडस्कर यांच्या सरपंच पदासाठी प्रसंगी न्यायालयात जाण्याचीही तयारी महिलांनी दर्शवली आहे.

काय आहे सरपंच पदाची कहाणी?
चंद्रपूर जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. यात राजुरा तालुक्यातील चुनाळा ग्रामपंचायतीवर भाजप नेते आणि माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले. १३ पैकी १३ ही ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या पॅनलचे निवडून आले. पण कहाणी यापुढची आहे. सरपंच पदाच्या सोडतीत चुनाळाचे सरपंचपद महिलेसाठी राखीव निघाले पण आता हे पदच आपल्याला नको असा आग्रह या नवनियुक्त महिलांनी धरलाय. गावाचा विकास साधू शकणाऱ्या बाळनाथ वडस्कर यांना हे पद द्यावे या मागणीसाठी अन्य सदस्य चक्क न्यायालयात जाण्यासाठी देखील तयार आहेत.

कोण आहेत बाळनाथ वडस्कर?
चुनाळा ग्रामपंचायतीत बाळनाथ उर्फ बाळू वडस्कर हे २०१० पासून सदस्य आहेत. मात्र या १० वर्षात वेळवेगळ्या प्रवर्गासाठी सरपंच पद राखीव असल्यामुळे त्यांना सरपंच होता आले नाही. मात्र सातत्याने लोकांची मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे हे ग्रामस्थांच्या गळ्यातील ताईत झाले आहे. सदस्यांची इच्छा आहे, मात्र यातून तोडगा काढू अशी प्रतिक्रिया खुद्द वडस्कर यांनी दिली आहे.

बाळनाथ वडस्कर यांना सरपंच करावे या मागणीसाठी या सातही नवनियुक्त महिला सदस्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन आरक्षण बदलण्याची मागणी केली आहे. सर्वसाधारण आरक्षण करा अशी मागणी करणारे चुनाळा ग्रामपंचायत सदस्यांचे निवेदन मिळाले असून ते वरिष्ठांकडे पाठवत आहोत, अशी माहिती तहसिलदारांनी दिली आहे. विकासाची कामे करणा-या बाळनाथ यांच्यासाठी गाव एकवटले आहे. त्यामुळे अन्य महिला सदस्य अर्ज करेल याची शक्यता नाही. एकाही महिलेने सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला नाही तर प्रशासनासमोर वेगळाच पेच निर्माण होणार आहे

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!