घोट–आष्टी मार्गावर भीषण अपघात; ट्रक पलटली, सुदैवाने जीवितहानी टळली
प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
घोट कडून आष्टी मार्गे लठ्ठे (लाकूड) भरून जात असलेली ट्रक (MH 34 AV 9718 )ठाकूरनगर जवळील धोकादायक वळणावर आज दुपारी पलटली. अपघात भीषण असला तरी सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वळणावर गाडी घसरून रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून लाकडाचे ओंडके रस्त्यावर विखुरले गेले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला बाहेर काढले. चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात हलविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, ठाकूरनगर येथील वळण धोकादायक असल्याने येथे वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. संबंधित विभागाने तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.







