Home Breaking News अवकाळी पावसाने रेगडी परिसर झोडपला; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…

अवकाळी पावसाने रेगडी परिसर झोडपला; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…

137

अवकाळी पावसाने रेगडी परिसर झोडपला; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
जिल्हा प्रतिनिधी विक्रम शाहा |
हवामान खात्याने २३ व २४ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज अचूक ठरत चामोर्शी तालुक्यातील रेगडी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून परिसरातील शेती संकटात सापडली आहे.
रेगडी, विकासपल्ली व आसपासच्या गावांमध्ये सायंकाळी अचानक ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. विशेषतः मका, तुरी, मूंग, कपाशी यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी उभ्या पिकांवर पावसाचे पाणी साचल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या भागातील बहुतांश शेतकरी पावसावर अवलंबून असल्याने आधीच अस्थिर हवामानाचा सामना करत आहेत. त्यातच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. काही ठिकाणी काढणीस आलेली पिके भिजल्याने गुणवत्तेत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी बाजारात कमी दर मिळण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या रेगडी परिसरातील शेतकरी सध्या चिंतेत असून पुढील हवामानाची अनिश्चितता त्यांच्या अडचणी आणखी वाढवू शकते.

Don`t copy text!