पाच दिवसापासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला; भाग्यश्री ताई आत्राम यांचा जाहीर पाठिंबा
आजपासून आमरण उपोषनाला होणार सुरवात
तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार
एटापल्ली : शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता तसेच एटापल्ली-देवदा-गडचिरोली, हेडरी-गट्टा तसेच एटापल्ली-जारावंडी रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ होत असताना अपघातांचा धोका वाढला असून पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात उडणारी प्रचंड धूळ यामुळे परिस्थिती अधिक बिकट होत आहे. धुळीमुळे परिसरातील हवा प्रदूषित होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना श्वसनविकार, अॅलर्जी आणि डोळ्यांच्या तक्रारींना सामोरे जावे लागत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. व्यापारी वर्गालाही या समस्येचा मोठा फटका बसत असून ग्राहकांची ये-जा कमी झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
या ज्वलंत प्रश्नाबाबत वारंवार निवेदने, मागण्या आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाने ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप करत एटापल्ली येथील व्हॉइस ऑफ मीडिया शाखेच्या पत्रकार संघटनेने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले असून या उपोषणामुळे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आंदोलनस्थळी विविध सामाजिक संघटना आणि नागरिक भेट देऊन समर्थन व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या आंदोलनाला राजकीय पाठबळही मिळू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम (हल्गेकर) यांनी आंदोलनस्थळी भेट देत पत्रकारांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “पत्रकार संघटना १३ फेब्रुवारी २०२६ पासून आमरण उपोषणाचा इशारा देत असताना त्यांच्या प्रकृतीस काही बाधा झाल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. रखडलेल्या विकासकामांबाबत प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करून कामास सुरुवात करावी, अशी मागणी त्यांनी केली.

पत्रकार संघटनेने रस्त्याची त्वरित दुरुस्ती, धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणी व इतर उपाययोजना, तसेच कामातील हलगर्जीपणाबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या परिसरात प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण असून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास व्यापक जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एटापल्लीतील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे







