Home Breaking News महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे – सौ.अर्चना भोंगळे…

महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे – सौ.अर्चना भोंगळे…

336

महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे – सौ.अर्चना भोंगळे

गोंडपिपरी तालुक्यातील चेक पारगांव येथे महिला सशक्तीकरण व गुणगौरव सोहळा संपन्न.

प्रतिनिधी शरद कुकुडकर

गोंडपिपरी: आजच्या युगात महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता प्रत्येक क्षेत्रात आपली प्रतिभा सिद्ध केली पाहिजे. शिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर आपण अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. समाजात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येणे गरजेचे आहे. जेव्हा एक स्त्री प्रगत होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि समाज प्रगत होतो. त्यामुळे संधीचे सोने करून महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे,असे प्रतिपादन सौ.अर्चना देवराव भोंगळे यांनी केले.

गोंडपिपरी तालुक्यातील चेक पारगांव येथे महिला सशक्तीकरण व गुणगौरव सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलतांना सौ.भोंगळे म्हणाल्या की, स्त्री ही शक्तीचे रूप आहे आणि तिच्यात संकटांशी लढण्याचे उपजत कसब असते. प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. आज विविध क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये प्रचंड प्रतिभा आहे,मात्र तिला योग्य दिशा देण्याची गरज असून महिलांनी जिद्द, चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावे,असेही सौ.भोंगळे यांनी सांगितले.

यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी माजी जि. प. सदस्या वैशाली बोडलावार, पोलिस पाटील पुरुषोत्तम देवगडे, गौरव गोनपल्लीवार, नानाजी विरुटकर, पंकज विरुटकर, प्रेमलता गोनपल्लीवार, ग्राम पंचायत सदस्या उषा कांबळे,मीरा गुंडावार,यांचेसह महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Don`t copy text!