एटापल्ली ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या बदलीला तीव्र विरोध; डॉ. तूपेश उईके यांची बदली रद्द करण्याची मागणी
प्रतिनिधी आदित्य चिप्पावार एटापल्ली
एटापल्ली तालुका हा अतिदुर्गम व आदिवासी भाग असून येथील नागरिकांचे आरोग्य पूर्णतः एटापल्ली ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. तूपेश उईके यांची बदली करून त्यांना ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे रुजू होण्याचे आदेश देण्यात आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या ७ जानेवारी २०२६ रोजीच्या आदेशानुसार सदर बदली करण्यात आली आहे. मात्र सध्या एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, अत्यल्प मनुष्यबळावर आरोग्य सेवा सुरू आहे.
डॉ. तूपेश उईके हे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असताना अत्यंत कार्यक्षम, कर्तव्यदक्ष व लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जात आहेत. त्यांच्या कार्यकाळात दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना वेळेवर व प्रभावी आरोग्य सेवा मिळाल्याने रुग्णालयावरील जनतेचा विश्वास वाढला आहे.
अशा परिस्थितीत डॉ. उईके यांची बदली झाल्यास एटापल्लीतील आरोग्य सेवा पूर्णतः कोलमडण्याची शक्यता असून, गर्भवती महिला, बालके, वृद्ध नागरिक तसेच आपत्कालीन रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष रेखा गजानन मोहूर्ले यांनी तहसीलदार एटापल्ली यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन सादर करून, डॉ. तूपेश उईके यांची बदली व मूळपदस्थापना आदेश तात्काळ रद्द करून त्यांना एटापल्ली ग्रामीण रुग्णालयातच मूळ वैद्यकीय अधीक्षक पदावर कायमस्वरूपी नियुक्त करण्याची जोरदार मागणी केली आहे.
या मागणीला बांधकाम सभापती निर्मला कोंडबतुलवार, पाणीपुरवठा सभापती नामदेव हिचामी, नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार, नगरसेवक राहुल कुळमेथे, नगरसेवक जितेंद्र टि
कले, नगरसेविका निर्मला हिचामी तसेच भाजप जिल्हा सदस्य योगेश्वर नल्लावार यांच्यासह नगरपंचायत पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना व स्थानिक नागरिकांचा व्यापक पाठिंबा मिळत आहे.







