नेलगुंडा पोलीस स्टेशन येथे भव्य आरोग्य मेळावा; 300 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार
नेलगुंडा (ता. भामरागड) :
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत तसेच डॉक्टर शालिनीताई मेघे हॉस्पिटल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्टेशन नेलगुंडा येथे भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा आज शुक्रवार दि. ९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत संपन्न झाला.
सदर आरोग्य मेळावा मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली, मा. अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली व मा. अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी यांच्या संकल्पनेतून तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी अमोल सोळुंके यांच्या नेतृत्वात पार पडला. या उपक्रमासाठी पोलीस स्टेशन नेलगुंडा येथील पोलीस अंमलदार, एसआरपीएफ व सीआरपीएफ जवानांनी सहकार्य केले.
आरोग्य मेळाव्यास नेलगुंडा, भटपार, गोंगवाडा, महाकापाडी, मर्दमलिंगा, मोरमेठ्ठा आदी गावांतील सुमारे २८० ते ३०० नागरिकांनी उपस्थिती लावली. उपस्थित नागरिकांना सीआरपीएफचे ए.सी. कुंभार साहेब व प्रभारी अधिकारी अमोल सोळुंके साहेब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर शालिनीताई मेघे हॉस्पिटल, नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या तपासणीमध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, हाडांचे विकार, डोकेदुखी, क्षयरोग तपासणी, हातपाय दुखणे, डोळ्यांची तपासणी, बालरोग तपासणी, रक्तदाब, मधुमेह, सांधे व मनगट दुखणे, छातीत दुखणे, खोकला आदी आजारांबाबत एकूण १४५ नागरिकांनी मोफत तपासणी करून घेतली.
तसेच सीआरपीएफ तर्फे सिविक ॲक्शन अंतर्गत नेलगुंडा, भटपार, गोंगवाडा, महाकापाडी, मर्दमलिंगा व मोरमेठ्ठा या गावांमध्ये प्रत्येकी ५ टेबल याप्रमाणे एकूण ३० टेबल, १०० खुर्च्या व ७५ ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या संबंधित कार्यालयामार्फत सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
मेळाव्यानंतर उपस्थित नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. शेवटी प्रभारी अधिकारी अमोल सोळुंके साहेब यांनी नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.







